गोल्डन फायबर्स मधील कामगार व्यवस्थापना विरोधात आक्रमक

नांदगाव पेठ, अमरावती :- गोल्डन फायबर्स टेक्सटाईल पार्क, एम.आय.डी.सी, नांदगाव पेठ येथील आस्थापनेतील कामगारांनी व्यवस्थापनाविरोधात आक्रमक आंदोलन छेडले आहे. मनसे कामगार संघटनेच्या नेतृत्वात नांदगाव पेठ पोलीस स्टेशन येथे श्री रावत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये आस्थापनेतील अधिकारी श्री रावत यांच्याकडून महिलांवर अश्लिल भाषेचा वापर, शिवीगाळ आणि असभ्य वर्तन करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकाराच्या वर्तनामुळे कामगार वर्गात असंतोष निर्माण झाला आहे.
गोल्डन फायबर्स एलएलपी मध्ये गेल्या काही महिन्यांपासून कामगारांना विविध प्रकारे त्रास दिला जात आहे, तक्रारीमध्ये सांगितले गेले आहे की, गोल्डन फायबर्स एलएलपी मध्ये काम करणारे श्री रावत यांच्याकडून महिलांना अश्लिल व शिवीगाळ वक्तव्य आणि असभ्य वर्तन केले जात आहे. महिलांना घालून पाडून बोलणे, अश्लिल भाषेचा वापर करणे, तसेच सार्वजनिक ठिकाणी अपशब्द बोलून कामगारांचा मनोबल खालावणे या प्रकारची वर्तणूक केली जात आहे. कामगार संघटनांनी वारंवार या वर्तनाबद्दल आस्थापना आणि पोलिस प्रशासनाकडे तक्रारी दिल्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही केली गेली नाही. त्यामुळे कामगार सेना चिटणीस विक्की थेटे यांच्या नेतृत्वात नांदगाव पेठ पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
संघटनांनी पोलिसांना कळवले आहे की, जर तातडीने कठोर कार्यवाही केली गेली नाही, तर कामगारांचा उद्रेक होऊन, कायदा आणि सुव्यवस्था बिगडू शकते. कामगार संघटना आणि संबंधित व्यक्तींनी तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.