LIVE STREAM

Latest NewsMaharashtra

बापरे! मुंबईत हवेची गुणवत्ता घसरली, मुंबईतील हवा आरोग्यास घातक ?

मुंबई :- पश्चिमी प्रकोपामुळे आर्द्रतेचे वाढलेले प्रमाण, मंदावलेला वाऱ्याचा वेग, हवेत साचलेली प्रदूषके यांमुळे मुंबईमध्ये गुरुवारी दिवसभर धुरक्याचे साम्राज्य होते. दुपारनंतर धुरक्याची चादर अधिक गडद झाली आणि अवघ्या काही अंतरावरच्या इमारती धुरक्यामध्ये अदृश्य झाल्याचे चित्र होते.

मुंबईमधील धुरक्याच्या स्थितीबद्दल दुपारनंतर अनेक मुंबईकरांनी सोशल मीडियावर चर्चा करायला सुरुवात केली. दाट धुरक्याची चादर दिसत असताना, केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या ॲपवर मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक १६० ते १७० दरम्यान म्हणजे मध्यम श्रेणीत दिसत होता. काही खासगी ॲपवर ही आकडेवारी आरोग्यासाठी घातक अशीही नोंदली गेली.

दृश्यमानतेवरही परिणाम

मुंबईमध्ये गुरुवारी दिवसभर धुरक्याचे साम्राज्य होते. परळ, लोअर परळ, भायखळा या भागांमध्ये दाट धुरके दिसत असताना दुपारी ३च्या सुमारास भायखळ्याची हवेची गुणवत्ता १३० म्हणजे मध्यम श्रेणीत नोंदली गेली. संध्याकाळच्या सुमारास हा निर्देशांक १४४ होता. कुलाबा येथील केंद्रावरही हवा गुणवत्ता निर्देशांक दुपारी १०३, तर संध्याकाळी ७च्या सुमारास ११३ होता. मात्र, आझाद मैदान, ओव्हल मैदान येथून समोरच्या इमारतीही दिसत नव्हत्या.

प्रदूषण मापन केंद्रांची जागा चुकली ?

मुंबईतील भारतीय उष्णकटीबंधीय हवामान विज्ञान संस्थेशी निगडित प्रदूषण मापन केंद्राचा वीजपुरवठा बंद केल्याने निर्देशांकाची सरासरी अचूक नसल्याचा आरोपही करण्यात येत आहे. ‘आयआयटीएम’च्या माध्यमातून मुंबईत स्थापित केलेल्या केंद्रांवरून योग्य माहिती मिळत नसल्याची हरकत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सातत्याने घेतली होती. त्यानंतर या केंद्रांचा वीजपुरवठा बंद झाल्याने आता या केंद्रांवरून माहितीच मिळत नसल्याचे ‘आयआयटीएम’च्या काही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, यासंदर्भात ‘आयआयटीएम’चे अधिकारी उघडपणे बोलायला तयार नाहीत. मुंबईतील प्रदूषण मापन केंद्रे ही उद्याने, कमी प्रदूषणाच्या परिसरात बसवल्याने आकडेवारीमध्ये खरी परिस्थिती प्रतिबिंबित होत नाही, असेही सांगण्यात येत आहे.

मुंबईमध्ये आर्द्रता वाढल्याने आणि आधीपासूनच धूळ असल्याने धुरके अधिक दाट झाल्याची माहिती ‘आयआयटीएम’च्या सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी अँण्ड वेदर फोरकास्टिंग अँण्ड रिसर्चचे (सफर) माजी प्रकल्प संचालक डॉ. गुफरान बेग यांनी दिली. मुंबईतील सध्याच्या परिस्थितीनुसार विविध ठिकाणी पीएम १० या प्रदूषकाच्या आकडेवारीमध्ये वाढ होणे अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले. वातावरण या संस्थेचे संस्थापक भगवान केशभट यांनी गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम झाल्याचे सांगत जणू धूळच श्वासासोबत शरीरात जात असल्याची भावना व्यक्त केली. मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक हा १५० च्या पुढे असल्याने जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणकांनुसार हा निर्देशांकही आरोग्याला घातक असल्याचे ते म्हणाले.

६० ठिकाणी प्रदूषण मापन केंद्रे

‘प्रत्येक थंडीमध्ये मुंबईमध्ये ही परिस्थिती निर्माण होते. वाऱ्याचा वेग कमी झाल्याने प्रदूषके साचून राहतात. प्रत्येक पालिकेला हवेच्या गुणवत्ता निर्देशांकासंदर्भात सूचना दिल्या असून, जेव्हा निर्देशांक २०० च्या वर जातो तेव्हा प्रदूषके नियंत्रणासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत हे सांगितले आहे’, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले. ‘लोकांनी शेकोटी करू नये, कचरा जाळू नये, हे सांगितले जात आहे. मुंबईच्या २४ विभागांसह महाराष्ट्रात ६० ठिकाणी प्रदूषण मापन केंद्रे स्थापित करण्यात येणार आहेत’, असे त्यांनी सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!