धंतोली पोलीस ठाणे हद्दीत इसमावर प्राणघातक हल्ला , इसमाचा मृत्यू

नागपूर :- धंतोली पोलीस ठाणे हद्दीत शुक्रवारच्या रात्री कुंभार टोळी हंम्पी यार्ड रोड, लोहारकर हॉटेलजवळ सिमेंट रोडवरील पेवर ब्लॉकवर एक अनोळखी इसम जखमी अवस्थेत आढळला. त्याच्यावर अज्ञात कारणावरून धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला असल्याची माहिती असून हल्लेखोर दोन ते तीन अनोळखी आरोपी ऑटो रिक्षातून आले होते अशी माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी इसमाने काही पावले चालून पेवर ब्लॉकवर पडला आणि त्याच्या जागीच मृत्यू झाला. मृतकाच्या खिशात PMT पुणे चे तिकीट आढळले, तसेच छातीवर धारदार शस्त्राने केलेली जखम दिसून आली. घटनास्थळी दोन ते तीन आरोपी ऑटोमधून पळून गेले होते. मृतकाची अद्याप ओळख पटलेली नाही. मृतकाचे वर्णन वय: अंदाजे ४० ते ४५ वर्ष, बांधा: सडपातळ, उंची: अंदाजे ५ फुट ६ इंच, डोक्याचे केस: काळे, अंगात: पिवळ्या रंगाचे फुल बाहयाचे टी-शर्ट, निळा राखाडी रंगाचा चौकडीचा शर्ट आणि काळा रंगाचा कोट असे असून, मृतकाची ओळख पटविण्यासाठी पोलीस ठाणे धंतोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणी फिर्यादी पोहवा. सुभाष वासाडे यांच्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षक तायडे यांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धंतोली पोलीस आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास करीत आहेत. तसेच मृतकाची ओळख पटविण्यासाठी पोलीस ठाणे धंतोली येथे संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे