संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी अमरावतीतही एकवटले आंदोलक
अमरावती :- मस्साजोग (बीड) येथील माजी सरपंच स्व. संतोष देशमुख आणि परभणी येथील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी अमरावती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एक दिवसीय ठिय्या आंदोलन आयोजित करण्यात आल. या आंदोलनात माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सहभागी होऊन आंदोलनाचे नेतृत्व केले.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. आज बीडमध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा हा काढण्यात आलाय. त्याच पार्श्वभूमीवर आज अमरावती शहरातील इरविण चौक स्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एक दिवसीय ठिय्या आंदोलन आयोजित करण्यात आल. या आंदोलनात माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सहभागी होऊन आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनात यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
त्यांनी सरकारला आव्हान देताना सांगितले, “आपल्याकडे एक म्हण आहे की, ‘सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही’. माझे मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की, जर या म्हणीला अधोरेखित करायचं नसेल, तर कारवाई स्वच्छपणे झाली पाहिजे. जर त्यांना कारवाई करायची असेल, तर त्यांनी स्पष्टपणे सांगितले पाहिजे की हे आमचे गुंडे आहेत आणि त्यावर पारदर्शकपणे कारवाई केली जाईल. सत्य महत्त्वाचे आहे, सत्ता महत्त्वाची नाही. हे लोकांना सांगणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील.” आंदोलनकर्त्यांनी माजी सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पित केली. त्याच वेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली, ज्या मध्ये “आरोपींना तात्काळ पकडा आणि फासावर लटकवा” अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनाने सरकारला कडक संदेश दिला आहे, तसेच स्व. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनकर्त्यांचा एकवटलेला विरोध स्पष्टपणे दर्शविला आहे.