नात्याला काळीमा फासणारी घटना ! १४ वर्षाची मुलगी गर्भवती… आजोबा, वडील अन् काकाने केलं काळं कृत्य

उत्तर प्रदेश :- आजोबा, वडील आणि काकाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उत्तर प्रदेशातील औरीया येथे ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे अल्पवयीन मुलगी ही दोन महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, जवळपास वर्षभर हा प्रकार सुरु होता. अशात शनिवारी पीडित मुलीने आरोपींच्या तावडीतून स्वतःची सुटका करत मावशीचे घर गाठले. तसेच तिला आपबिती सांगितली. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मुलीच्या मावशीने पोलिसांत तक्रार दाखल केली.
या तक्रारीनुसार, आरोपी वडील मुलीला आणि तिच्या आईला दररोज मारहाण करत होते. या मारहाणीला कंटाळून दोघीही दिल्लीला आजीकडे निघून गेल्या. काही दिवसांतच मुलीच्या वडिलाने दिल्लीत पोहोचत मुलीला घरी परत आणले. त्यानंतर वडील, काका आणि आजोबाने वर्षभर तिच्यावर सातत्याने लैंगिक अत्याचार केला. यात ती दोन महिन्यांची गर्भवती राहिली.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच आरोपींची डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.
यासंदर्भात बोलताना अतिरिक्त पोलीस अधिक्षक आलोक मिश्रा म्हणाले, “मुलीच्या मावशीच्या तक्रारीनंतर आम्ही याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आम्ही मुलीला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवले होते. त्यात ती दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे पुढे आलं आहे. लवकरच तिन्ही आरोपींची डीएनए चाचणी होणार असून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.