बुमराह-सिराजचा जलवा ; शेवटी कांगारुंच्या शेपटी नं फिफ्टी सह दमवलं !

जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्या भेदक माऱ्यासमोर चौथ्या दिवसाच्या खेळात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के दिले. भारतीय संघ चौथ्या दिवशीच ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या डाव संपुष्टात आणत बॅटिंगसाठी मैदानात उतरेल, असे वाटत होते. पण शेवटी कांगारुंच्या शेपटीनं दमवलं. नॅथन लायन आणि बोलँड यांनी अखेरच्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाची आघाडी भक्कम केली. या जोडीच्या चिवट खेळीच्या जोरावर चौथ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियन संघानं ९ बाद २२८ धावा करत मेलबर्न टेस्ट मॅचमध्ये ३३३ धावांची आघाडी घेतली आहे.
सलामीवीरांसह पहिल्या डावातील ‘शतकवीर’ स्मिथ स्वस्तात अडकला जाळ्यात
चौथ्या दिवसाच्या खेळात भारतीय संघाचा पहिला डाव ३६९ धावांवर आटोपल्यावर ऑस्ट्रेलियन संघाने १०५ धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावाला सुरुवात केली. बुमराह आणि सिराजच्या भेदक माऱ्यासमोर कांगारुंच्या ताफ्यातील आघाडीच्या फळीतील फलंदाजांचा निभाव लागला नाही. बुमराहनं सलामीवीर सॅमच्या रुपात ८ अवघ्या २० धावांवर ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. सिराजनं उस्मान ख्वाजाचा खेळ खलल्लास केला. ४३ धावांवर ऑस्ट्रेलियाने दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या. स्टार बॅटर स्टीव्हन स्मिथही सिराजच्या जाळ्यात अडकला अन् ऑस्ट्रेलियन संघ अडचणीत सापडला. ऑस्ट्रेलियनं संघाने दुसऱ्या डावात ८० धावांत आघाडीच्या तीन विकेट्स गमावल्या होत्या.
बुमराहनं एका षटकात ट्रॅविसह हेडसह मिचेल मार्शला दाखवला तंबूचा रस्ता
स्मिथ तंबूत परतल्यावर ट्रॅविस हेड मैदानात उतरला. तो येताच रोहित शर्मा आपला हुकमी एक्का अर्थात जसप्रीत बुमराहला पुन्हा गोलंदाजीसाठी आणले, बुमराहनंही पहिल्याच चेंडूवर ट्रॅविस हेडला माघारी धाडले. तो फक्त एक धाव करू शकला. मिचेल मार्शला तरी बुमराहनं खातेही उघडू दिले नाही. ८५ धावांत ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत परतला होता. त्यानंतर एलेक्स कॅरीच्या रुपात जसप्रीत बुमराहनं ऑस्ट्रेलियाला ९१ धावांवर सहावा धक्का दिला.
सिराजनं फोडली सेट झालेली मार्नस लाबुशेन-पॅट कमिन्स जोडी
शंभरीच्या आत ऑस्ट्रेलियाच्या सहा गड्यांना तंबूत धाडत टीम इंडियाने मॅचमध्ये जबरदस्त कमबॅक केले. पण मार्नस लाबुशेन आणि पॅट कमिन्स जोडी जमली. दोघांनी सातव्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. ही जोडी सेट करण्यात यशस्वी जैस्वालनंही हातभार लावला. त्याने मार्नस लाबुशेनसह पॅट कमिन्सचा झेल सोडला. ही जोडी सिराजनं फोडली. मार्नस लाबुशेनला त्याने ७० धावांवर पायचित केले.
जड्डूसह पंतनं मिळवून दिली एक विकेट, पण अखेरची जोडी फुटलीच नाही
रवींद्र जडेजानं ऑस्ट्रेलियन पॅट कमिन्सला ४१ धावांवर तंबूत धाडले. विकेट किपर रिषभ पंतने एका अप्रतिम थ्रोवर मिचेल स्टार्कला रन आउट करत संघाला विकेट्स मिळवून दिली. त्यानंतर नॅथन लायन आणि स्कॉट बोलँड यांनी केलेल्या छोट्याखानी पण महत्त्वपूर्ण भागीदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २०० धावांचा आकडा पार केला. नॅथन लायन ४१ (५४) आणि स्कॉट बोलँड १० (६५) यांनी दहाव्या विकेटसाठी १०९ चेंडूत ५५ धावांची भागीदारी करत टीम इंडियाच्या गोलंदाजांना दमवलं. या दोघांनी संघाची आघाडी ३३३ धावांसह भक्कम केली आहे.