मनमोहन सिंग यांना पेन्शन किती मिळायची ? आता कुटुंबातील कोणत्या व्यक्तीचा असणार हक्क ?

मनमोहन सिंग पेन्शन रक्कम :- भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 26 डिसेंबर रोजी रात्री वयाच्या 92 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. देशाचे 10 वर्ष पीएम राहत त्यांनी देशात अनेक सुधारणा घडवून आणल्या. दरम्यान, पंतप्रधानपद सोडल्यानंतरही मनमोहन सिंग यांना शासकीय नियमांनुसार अनेक सुविधा मिळत होत्या. याशिवाय त्यांना दर महिन्याला 20 हजार रुपये पेन्शनही मिळत होती. आता त्यांच्या मृत्यूनंतर ही पेन्शन कोणाला मिळणार, हा प्रश्न आहे. यावर कुटुंबातील कोणत्या सदस्यांचा हक्क असेल? त्याचबरोबर इतर सुविधांचा लाभही कोणत्या सदस्यांना मिळणार? याबाबत जाणून घेऊयात.
मनमोहन सिंग यांना कोण कोणत्या सुविधा मिळायच्या ?
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधानपद सोडल्यानंतर डॉ. मनमोहन सिंग यांना नवी दिल्लीमध्ये मोतीलाल नेहरू मार्गावर असलेला बंगला राहण्यासाठी देण्यात आला होता. माजी पंतप्रधान असल्याने त्यांना पहिल्या पाच वर्षांत विशेष सुविधा देण्यात आल्या होत्या, मात्र त्यानंतर नियमानुसार बदल करण्यात आले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सुरुवातीच्या काही वर्षात एसपीजी संरक्षण मिळत होते. यानंतर त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली होती. त्यामुळे मनमोहन सिंग यांना एक वर्षासाठी एसपीजी आणि नंतर झेड प्लस सुरक्षा देण्यात आली. याशिवाय त्यांना कॅबिनेट मंत्र्याच्या बरोबरीच्या सुविधा मिळत होत्या. यामध्ये दरमहा 20,000 रुपये पेन्शन, लुटियन झोनमध्ये आयुष्यभर मोफत निवास, आयुष्यभर मोफत वैद्यकीय सुविधा, वर्षभरात सहा देशांतर्गत विमान तिकिटे, सर्वत्र मोफत रेल्वे प्रवास, मोफत वीज आणि पाच वर्षांनी एक वैयक्तिक सहाय्यक आणि एक शिपाई उपलब्ध असायचा. याशिवाय कार्यालयीन खर्चासाठी वार्षिक सहा हजार रुपयेही दिले जायचे.
मनमोहन सिंग यांच्या कुटुंबातील कोणाला मिळणार पेन्शन ?
डॉ.मनमोहन सिंग यांना दरमहा 20 हजार रुपये पेन्शन मिळत असे. नियमांनुसार आता ही पेन्शन त्यांची पत्नी गुरशरण कौर यांना दिली जाणार आहे. याशिवाय घरांच्या सुविधांमध्ये कोणतीही कपात होणार नाही. दरम्यान आता मनमोहन सिंग यांच्या पत्नी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना या सुविधा मिळत राहतील. यामध्ये सरकारी रुग्णालयात मोफत उपचार, रेल्वेमध्ये मोफत प्रवास आणि सवलतीच्या दरात विमानाने प्रवास करण्याची सुविधा यांचा समावेश असेल. त्याचबरोबर सुरक्षा रक्षक आणि इतर सुरक्षा व्यवस्थाही मिळत राहणार आहे.