विमान कोसळून ३८ जणांचा मृत्यू; आता पुतीन यांचा माफीनामा; धक्कादायक घटनाक्रमाचा उलगडा

मॉस्को :- कझाकिस्तान विमान अपघात प्रकरणात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी माफी मागितली आहे. घडलेली दुर्घटना अतिशय दुखद असल्याचं पुतीन म्हणाले. युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना रशियाच्या हवाई सुरक्षा यंत्रणेकडून हा प्रकार घडल्याची कबुली त्यांनी दिली आहे. अझरबैजान एअरलाईन्सचं विमान कोसळून ३८ जणांचा मृत्यू झाला. अक्ताऊमध्ये विमानाला अपघात झाला.
J2-8243 विमान कझाकिस्तानच्या अक्ताऊमध्ये बुधवारी कोसळलं. ज्यावेळी विमानाला अपघात झाला, त्यावेळी त्या भागात युक्रेनकडून ड्रोन हल्ले सुरु होते. त्यांना प्रत्युत्तर देण्याचं काम रशियन हवाई सुरक्षा यंत्रणेकडून सुरु होतं. विमानाला अपघात झाल्यानंतर चौकशी सुरु झाली. तपास करण्यात आला. विमानाच्या बाहेरील भागावर दिसलेल्या खुणांमुळे संशय वाढला. क्षेपणास्त्राचे तुकडे लागल्यानं जशा प्रकारच्या खुणा दिसून येतात, तशा खुणा विमानाच्या बाहेरील भागांवर आढळून आल्या. या अपघातात २ वैमानिक आणि कर्मचाऱ्यांसह ३८ जणांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर अझरबैजान एअरलाईन्सकडून सर्वेक्षण करण्यात आलं. रशियन हवाई सुरक्षा यंत्रणेनं चुकून विमानावर हल्ला करण्यात आल्याचा दावा तपास अहवालात करण्यात आला. जमिनीवरुन हवेत सोडण्यात येणाऱ्या क्षेपणास्त्रानं हा हल्ला करण्यात आलेला होता. आता रशियानं आरोप स्वीकारले आहेत. याआधी रशियानं युक्रेनवर खापरं फोडण्याचा प्रयत्न केला होता. युक्रेननं रशियाचे सगळे आरोप फेटाळून लावले आणि तपासाचं आवाहन केलं.
यानंतर आता रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. ‘अध्यक्ष व्लादिमीर पुतीन दु:खद घटनेबद्दल माफी मागत आहेत. आम्ही पुन्हा एकदा मृतांच्या कुटुंबियांबद्दल सहवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकर आराम पडावा यासाठी प्रार्थना करतो. अपघात झाला त्यावेळी ग्रोन्जी, मॉजडोक आणि व्लादिकावकाज परिसरात युक्रेनकडून ड्रोन हल्ले सुरु होते. त्याला रशियाच्या हवाई सुरक्षा यंत्रणेकडून प्रत्युत्तर दिलं जात होतं,’ अशी माहिती निवेदनात आहे.