वाल्मिक कराड अखेर पोलिसांना शरण

गेल्या काही दिवसांपासून फरार असलेला वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आरोप होत असलेल्या वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी ऑफिसच्या मुख्यालयामध्ये शरण आला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड गेल्या अनेक दिवसांपासून फरार होते. बीड जिल्ह्यामध्ये २८ डिसेंबरला सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दोन हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेलाय. वाल्मिक कराडला सरकारमधील कोणाचा वरदहस्त आहे का? नेमकं कोण कोणाला पाठिशी घालतंय? असे अनेक प्रश्न सामान्य जनतेला पडले होते. विरोधी पक्षातील नेत्यांसह सरकारमधील आमदारांनीही संतोष देशमुख प्रकरणात कराडांवर आरोप केल्याने सरकारवरही दबाव वाढला होता. अखेर वाल्मिड कराड आता शरण आल्याने या प्रकरणात आता काय खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मी वाल्मिक कराड, केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असताना, सीआयडी ऑफिस, पुणे पाषाण रोड येथे सरेंडर होत आहे. संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी, राजकीय द्वेषापोटी माझं नाव जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष येतील आणि मी त्यात दोषी दिसलो, तर न्यायदेवता जी शिक्षा देईल, ती भोगायला मी तयार आहे, असं वाल्मिक कराड यांनी अस म्हणत एक Video शेअर करत पोलिसांना शरण होणार अस स्पष्ट सांगितल. दरम्यान, वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला असला तरी मुख्य आरोपी सुदर्शन घुले अद्यापही फरार आहे. परंतु वाल्मिक कराड हा स्वत: शरण आल्याने सरकार आणि सीआयडीचे अपयश असल्याचं मानलं जात आहे. दोन तीन दिवसांपासून कराडने सर्व सेटिंग केली आणि शरण आल्याची टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तब्बल २२ दिवसांनंतर वाल्मिक कराड हा शरण आला, पोलीस आणि साआयडीला त्याचा शोध घेता न आल्याने सरकारचेही अपयश मानले जात आहे.
या प्रकरणात सीआयडीच्या तपासाला वेग आला आहे. तपास पथकाने हत्येच्या घटनेनंतर आरोपींनी गाडीत सोडलेले दोन स्मार्टफोन जप्त करून तांत्रिक विश्लेषणासाठी पाठविले आहेत, तसेच गुन्ह्यात वापरलेली चारचाकीचीही तपासणी केली जात असून, अनेकांची चौकशी केली आहे. या गुन्ह्याच्या तपासा दरम्यान दोन स्मार्टफोन जप्त केल्यानंतर गेल्या २४ तासात अनेक लोकांची चौकशी करण्यात आली आहे. आणखी लोकांची चौकशी केली जाणार आहे, तसेच मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आला असून, चारचाकीचीही तपासणी सुरू आहे, असे सीआयडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
मुख्यमंत्र्यानी सीआयडी ला दिलेल्या आदेशावरून वाल्मिक कराडसहीत संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामधील अन्य तीन आरोपींची बँक खाती रविवारी गोठवण्यात आली. त्यामुळेच कराड फार दूर जाऊ शकत नाही, अशी चर्चा मागील दोन दिवसांपासून होती. तसेच वाल्मिक कराडकडे पासपोर्टच नसल्याने तो देशाबाहेरही जाऊ शकत नव्हता. वाल्मिक कराड हा महाराष्ट्रातच असल्याच्या बातम्या रविवारी समोर आल्या. त्यामुळेच वाल्मिक कराड सोमवारी रात्री उशीरापर्यंत शरण येईल असं सांगितलं जातं होतं. मात्र सोमवारी वाल्मिकी शरण आला नाही. मात्र मंगळवारी दुपारच्या सुमारास वाल्मिकीने एक व्हिडीओ जारी केला. या व्हिडीओमध्ये आपण कुठल्याही पद्धतीची खंडणी मागितली नाही असा दावा करत, आपल्यावरील आरोप चुकीचे असल्याचेही त्याने Video मध्ये म्हटले आहे.
महत्वाच म्हणजे सीआयडी कडून मंगळवारी वाल्मिक कराडसह त्याच्या नातेवाईकांची खातीही गोठवली गेली, हा वाल्मिक कराडसाठी मोठा धक्का मानला जात होता. खाती गोठवल्याने आर्थिक कोंडी झाली. त्यामुळेच आज वाल्मिक कराड शरण आला.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी सीआयडीची 9 पथकं कार्यरत आहेत. या तपासामध्ये दीडशे अधिकारी अन् कर्मचारी आहेत. फरार आरोपींच्या पासपोर्ट विषयीही कारवाई सुरु आहे. केवळ राज्यच नाही तर देशभरामध्ये या प्रकरणाच्या तपासाचे धागेदोरे असल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळावरी ठशांचे निशाण आरोपींबरोबर जुळून आल्याची माहितीही समोर येत आहे. आरोपींच्या स्कार्पिओ कारमध्ये मिळून आलेले अन् जप्त केलेले दोन्ही मोबाईल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दोन्ही मोबाईल सीआयडीकडून प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. मोबाईलमध्ये नेमकं काय दडलं आहे हे तपासणीनंतर समोर येणार आहे. अद्याप मोबाईलमधील कुठलेही व्हिडिओ अथवा चॅट समोर आले नसल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रयोग शाळेतील तपासणीनंतरच मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला का? व्हिडिओ कॉल केला का? कोणाला फोन केला का? या प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.