खातेवाटपानंतर पहिली कॅबिनेट, धनंजय मुंडेंची एन्ट्री, फडणवीसांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळाचे दोन धडाकेबाज निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारची नव्या वर्षातील पहिली मंत्रिमंडळ बैठक आज पार पडली. खातेवाटप झाल्यानंतर मुंबईत होणारी ही पहिलीच बैठक असल्यामुळे सर्वांच्या नजरा याकडे लागल्या होत्या. खातेवाटप होऊन आठवडा झाल्यानंतरही काही मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नसल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात होती. वाल्मिक कराड प्रकरणात आरोपांच्या केंद्रस्थानी असलेले धनंजय मुंडेही या बैठकीला हजर होते.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी १२ वाजता झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबै बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास वित्त विभागाने मंजुरी दिली. मुंबै बँक ही भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याशी संबंधित असल्यामुळे विरोधकांकडून त्याच्यावर टीकेची झोड उठवण्याची शक्यता आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
- महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम-220 मध्ये आकारी पड जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय (महसूल विभाग)
- शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास तसेच महामंडळ, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीस प्राधिकृत करण्यास मंजुरी (वित्त विभाग)