प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात गडचिरोली नक्षलमुक्त करण्यासह नागरिकांना मुख्य प्रवाहात आणणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा आणि मार्गदर्शन यामुळेच गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि आदिवासी भागांच्या विकासासाठी अथक प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे आपल्या ‘एक्स’ या समाजमाध्यमावर नमूद केले आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या नेतृत्वात गडचिरोली नक्षलमुक्त करून आदिवासी बांधवांचे जल, जमीन आणि जंगल हे हक्क अबाधित ठेवत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात येईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. त्यांच्या उपस्थितीत जहाल नक्षली ताराक्कासह 11 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर 77 वर्षांत प्रथमच अहेरी ते गर्देवाडा या बससेवेचा त्यांनी शुभारंभ केला. या बसमधून त्यांनी प्रवासही केला. लॉईडच्या विविध उपक्रमांचा त्यांनी शुभारंभ केला. यातून 6 हजार 200 कोटींची गुंतवणूक होत असून, चार हजारावर रोजगारनिर्मिती होत आहे. गट्टा-गर्देवाडा-वांगेतुरी मार्ग तसेच ताडगुडा पुलाचे श्री. फडणवीस यांनी लोकार्पण केले. पेनगुंडा येथे जवानांशी आणि ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला. या भागात जाणारे ते पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत. गडचिरोली जिल्ह्याची ही विकासयात्रा यापुढेही सुरू राहील, असा विश्वास श्री. फडणवीस यांनी येथील नागरिकांना दिला.