AmravatiLatest News
विकासासाठी महिलांना प्रोत्साहन देण्यात यावे – जिल्हाधिकारी सौरभ कटियार

महिलांमध्ये विकासाची मोठी क्षमता आहे. त्या कोणतेही काम करण्यास सक्षम आहेत. त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी महिलांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.
मेळघाट हाट येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महिला व बालविकास उपायुक्त विलास मरसाळे, आत्माच्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. उमेश टेकाळे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, प्रमुख वक्त्या क्षिप्रा मानकर, आहारतज्ज्ञ दिपाली भैसे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी, संपूर्ण समाज मुलींच्या शिक्षणाच्या विरोधात असताना सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिकविले. महिलांच्या सशक्तीकरणाच्या दृष्टीने शिक्षण महत्वाचे ठरले आहे. महिलांच्या शिक्षणामुळे आज सर्व क्षेत्रात महिलांचा पुढाकार आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी माविम चांगले कार्य करीत आहे. नुकत्याच झालेल्या महालक्ष्मी सरसमध्ये जिल्ह्याला दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. बचतगटांना मेळघाट हाटच्या माध्यमातून पॅकेजिंग, ब्रँडींगची सुविधा दिल्यामुळे विविध संकेतस्थळावरून या वस्तूंची विक्री होणार आहे. महिलांवर टाकलेला विश्वासाने केलेले कार्य सार्थ ठरविले आहे.
श्रीमती महापात्र यांनी, महिलांनी एकमेकींना प्रोत्साहित आणि पाठींबा देण्याची गरज आहे. सुदैवाने राज्यातील महिला सक्षम आहेत. महिलांनी वस्तू उत्पादीत करताना त्यांच्या पॅकेजिंगवरही लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. महिलांमध्ये प्रचंड क्षमता आहे. त्यांना केवळ प्रोत्साहनाची गरज आहे. पर्यटन विभागाने 15 लाख कर्ज देणारी आई योजना जाहिर केली अहो. याचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
प्रमुख वक्त्या क्षीप्रा मानकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील विविध प्रसंगावर प्रकाश टाकला. पतीच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी महिला शिक्षणाचे कार्य नेटाने पार पाडले. तसेच केशवपनाविरूद्ध न्हाव्यांचे मतपरिवर्तन करून त्यांचा सहभाग करून घेतला. त्यासोबतच त्यांनी साथीच्या काळात अमुल्य योगदान दिले. महिलांनी त्यांचा वैचारिक वारसा जपावा, असे आवाहन केले.
यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या रांगोळीभोवतील 194 दिवे प्रज्वलीत करण्यात आले. याठिकाणी सकस आहार स्पर्धा घेण्यात आली. तसेच पिंक ई-रिक्षाचे सादरीकरण करण्यात आले.
यावेळी सकस आहार स्पर्धेतील प्रथम अरूणा वंजारी, द्वितीय विणा जामनिक, आणि तृतीय गौतमी म्हैसकर यांचा सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट व्यवसाय करणाऱ्या सरिता किल्लेदार, कृष्णमूर्ती ढेरे, भाग्यश्री खरकाटे, निलिमा बोबडे, अर्चना बोबडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रविणनगर येथील सिदरा महिला बचतगटाला सहा लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला. एकता अल्पसंख्याक लोकसंचालित साधन केंद्राच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.