आपदा मित्रांच्या धाडसी बचाव कार्यामुळे युवकाचा जीव वाचला

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील माळवाडी येथे एक युवक नदीत बुडाल्याची माहिती मिळताच आपदा मित्रांची टीम घटनास्थळी तात्काळ पोहोचली आणि अत्यंत धाडसाने युवकाला वाचवण्यात यश मिळवले. रुपम सिंग सूर्यवंशी, वय ३३, निवासी केवल कॉलनी,अमरावती, हा युवक मोर्शी पोलीस स्टेशन अंतर्गत माळवाडी येथील नदीत बुडाल्याची माहिती आपदा मित्रांना मिळाली. घटनास्थळी पोहोचलेल्या आपदा मित्रांनी तात्काळ बचाव कार्य सुरू केले आणि युवकाला झाडाच्या सहाय्याने अडकलेल्या स्थळावरून सुरक्षित बाहेर काढले. यासाठी बोट, लाइफ बॉय जॅकेट, लाइफ बॉय रिंग आणि रोपाचा वापर करण्यात आला. अखेर युवक सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश मिळाले आणि या युवकाला मोर्शी पोलीस पाटील अमोल बोरकुल व पोलिस हवालदार छत्रपती करपते यांच्या स्वाधीन करण्यात आले. आपदा मित्रांची टीमच्या प्रियांशू तायवाडे, विवेक सावरकर, सागर तायडे, सुरज धुर्वे आणि सागर काळे यांनी मिळून या युवकाचा जीव वाचवला. या आपत्तीमुक्त कार्यासाठी आपदा मित्रांची आणि जीवनसेतू जलमित्र आपत्ती बचाव दलाच्या टीमचे कौतुक करण्यात आले. या साहसी कार्यामुळे पुन्हा एकदा आपत्ती व्यवस्थापनाच्या महत्त्वाची जाणीव होते.