City CrimeLatest News
पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला अटक

फ्रेजरपुरा पोलीस ठाणे हद्दीत भवते लेआऊट येथील एका बंद घरात गुरुवारी सायंकाळी २६ वर्षीय अंजली अक्षय लाडे हिचा रक्ताने माखलेला मृतदेह पोलिसाना सापडला. 24 तासातच पोलिसांनी हत्येचे गूढ सोडवून आरोपी पती अक्षय लाडे याला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, ६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी रोजी अक्षय लाडे वय वर्ष 32, राहणार भावते लेआउट याने पत्नी अंजलीला कपडे घेण्यासाठी घरी बोलावले असता, अक्षयने दारूसाठी पैसे मागण्यावरून भांडण केले. या वादात अक्षयने अंजलीचा गळा दाबला, त्यानंतर अक्षयने किचनमधील चाकू आणून अंजलीच्यागळ्यावर वार केले, अशात तो चाकू तिच्या गळ्यातच राहिला. अंजलीच्या हत्येनंतर अक्षयने रक्ताचे डाग पुसले. अंजलीचा मृतदेह गादीखाली लपवून घराला कुलूप लावून, अंजलीची मोपेड घेऊन पळ काढला. दरम्यान दोन दिवस अंजली घरी पोहोचली नाही आणि तिचा मोबाईलही बंद असल्याने आईने फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदविली, त्यानंतर अंजलीची हत्या उघडकीस आली. अंजलीच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी तिची मोपेड रेल्वे स्टेशनवरून जप्त केली. पोलिसांनी अंजलीचा मोबाईल, आधार कार्ड आणि मोपेडच्या ट्रंकमधील 100 रुपये जप्त केले. पत्नीच्या हत्येनंतर अक्षय पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला छत्री तालाब परिसरातून अटक केली. आरोपी अक्षयला न्यायालयात हजर केले असता, त्याला ६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.