LIVE STREAM

Latest NewsMaharashtra Politics

यांनी बीडचा बिहार नाही तर हमास, तालिबान केला, जोपर्यंत संतोषचे मारेकरी फासावर जात नाहीत तोपर्यंत मनात राग ठेवा : सुरेश धस

मला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी यांच्या विरोधात बोलतोय असं नाही. जर तसं असेल तर मी शांत बसतो, घाना देशात राहून जातो पण तुम्ही संतोष देशमुखला परत आणाल का? त्याच्या कुटुंबीयांना न्याय द्याल का? असा सवाल भाजपचे आमदार सुरेश धस यांनी विचारला. जोपर्यंत संतोष देशमुखचे मारेकरी फासावर जात नाही तोपर्यंत मनात राग ठेवा असं आवाहन त्यांनी केलं. तसेच बीडचा बिहार नाही तर यांनी हमास आणि तालीबान करून ठेवलाय अशी जहरी टीका सुरेश धस यांनी केली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी पुण्यामध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. 

बीडचा यांनी हमास, तालिबान केला

संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांनी बीडचा बिहार नाही तर हमास, काबुलीस्तान आणि तालिबान केला असल्याची टीका सुरेश धस यांनी केली. ते म्हणाले की, “माझा रंगही काळा आहे. तुम्ही म्हणाल तर घाना देशात जाऊन राहतो. पण मग संतोष देशमुखला परत आणू शकाल का? संतोष देशमुख तिसऱ्यांदा सरपंच झाला. पण अजून त्याच्या कुटुंबीयांना राहायला घर नाही. त्यांना न्याय मिळालं पाहिजे, यात कसलं राजकारण आहे?”

राजीनामा घ्यायचा नसेल तर बिनखात्याचा मंत्री करा

मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा नसेल तर त्यांना बिनखात्याचा मंत्री करा अशी मागणी सुरेश धस यांनी केली. या आधी अनेकांनी राजीनामा दिले. आर आर पाटील, विलासराव देशमुख यांनाही राजीनामा द्यावा लागला होता. महायुतीच्या तीनही पक्षाच्या नेत्यांना विनंती करतो. यांचा राजीनामा घ्या, आमच्या मुलाला न्याय द्या अशी मागणी त्यांनी केली. 

मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही

सुरेश धस म्हणाले की, मी अजितदादावर टीका केली नाही. पण यांनी घेरा घातलाय त्यांना. ते लायकवान माणसं नाहीत. अजित दादा डोळे उघडून खाली बघा काय सुरू आहे ते. बारामती मतदारसंघातील तुमच्या विश्वासातली माणसे बीड जिल्ह्यात पाठवा म्हणजे सत्यता समोर येईल. तो सूरज चव्हाण माझ्यावर बोलला. अरे तो अजून बालवाडीतही नाही. तुम्ही काय बोलायचं ते बोला, मी तुमच्याकडे लक्ष द्यायचं नाही. मला संतोष देशमुख प्रकरणावरून लक्ष हटवायचं नाही. 

फक्त मराठा समाज नाही तर संपूर्ण जातीपाती या संतोष देशमुख यांच्यासोबत आहेत. वंजारी समाजातील काही लोक सोडली तर सगळ्यांना ही गोष्ट पटली नाही. तुम्ही जाती-जातीत का अंतर पाडताय? एखादी जात आम्ही टार्गेट करत नाही. त्या जातीतील चुकीचे नेतृत्व करत आहेत त्यांना सोडायचं नाही असं सुरेश धस म्हणाले. 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!