Latest NewsMaharashtra
ऑनर किलिंगने महाराष्ट्र हादरला! बहिणीला डोंगरावरुन ढकललं, क्रिकेट मॅचमुळं सापडला आरोपी

छत्रपती संभाजीनगर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 17 वर्षीय मुलीची 200 फूट डोंगरावरुन खाली ढकलून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून मुलीच्या सख्ख्या चुलत भावानेच तिची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेतलं असून एका व्हिडिओतून हत्येचा प्रकार उघडकीस आला आहे.
अंबड तालुक्यातील शहागड मुलगी घर सोडून निघून गेली होती. घरच्यांकडून जीवाला धोका असल्याची तक्रार मुलीने शहागड पोलिसांना दिली होती. त्यानंतर घरच्यांनी समजूत काढण्यासाठी मुलीला संभाजीनगरच्या वळदगाव येथे काकाच्या घरी पाठवले होते. काकाचा मुलगा ऋषिकेश याने गोड बोलून खावडा डोंगरावर गोड बोलून घेऊन गेला. त्याच डोंगरावरुन त्याने तिला खाली ढकलून दिले त्यात मुलीचा जागीचा मृत्यू झाला आहे.
अल्पवयीन मुलीचे वय 17 वर्ष असं असून आरोपीचे नाव ऋषिकेश तानाजी शेरकर वय 25 वर्ष आहे. पोलिसांकडून या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे. बहिणीने दुसऱ्या जातीतील मुलाशी प्रेम केले म्हणून भावाने तिची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दरम्यान हत्येचा हा थरार कॅमेऱ्यातदेखील कैद झाला आहे.
ज्या डोंगरावरुन आरोपीने बहिणीला खाली ढकलून दिले. त्या डोंगराखाली क्रिकेटची मॅच सुरू होती. यावेळी क्रिकेटच्या लाइव्ह प्रक्षेपणात ही दृष्ये चित्रित झाली आहेत. आरोपी डोंगरावरुन खाली उतरत असतानाचे व्हिडिओत दिसत आहे. दरम्यान या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी भाऊ ऋषिकेश याला एम.आय.डी.सी वाळूज पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान, आरोपीला याआधी एका प्रकरणात अटकेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.