संविधानाने दिलेला नागरिकत्वाचा हक्क हा मोठा दागिणा – प्राचार्य अॅड. जयमंगल धनराज

संविधानाने महिलांसाठी अनेक तरतुदी केल्या आहेत. त्यासाठी तरतुदीमागील तत्वज्ञान समजणे देखील आवश्यक आहे व त्याशिवाय कायदा कळणार नाही. अनेक स्वरुपात संविधानामध्ये महिलांसाठी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्यातील संविधानाने देशातील महिला व पुरुषांना दिलेला नागरिकत्वाचा हक्क हा मोठा दागिणा आहे, असे प्रतिपादन डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालय, वडाळा मुंबई येथील प्राचार्य अॅड. जयमंगल धनराज यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनानिमित्त विद्यापीठातील डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख अधिसभा सभागृहामध्ये ‘संविधानातील स्त्रीविषयक तरतुदी व त्याची प्रासंगिकता’ या विषयावर व्याख्यान देतांना ते बोलत होते. विचारपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्रमुख अतिथी म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. मनिषा कोडापे, अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड उपस्थित होते.
प्रा. अॅड. धनराज पुढे म्हणाले, संविधानामधील कलम 39 मध्ये महिलांसाठी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर मूलभूत अधिकार व राज्य धोरणाची नीतीदर्शक तत्वे यातही महिलांसाठी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. मूलभूत अधिकारांचे हनन झाल्यास त्यासाठी न्यायालयात दाद मागता येते, मात्र नीतीदर्शक तत्वे राज्य सरकारांना पाळावे लागतातच आणि त्यामुळेच प्रत्येक निवडणुकांमध्ये मतदारांसमोर सर्वांना जावे लागते आणि हाच संविधानाने नागरिकत्व आणि मतदानाचा दिलेला मोठा दागिणा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण देतांना ते म्हणाले, सर्व जातीपंथाच्या नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यदलात घेऊन सूराज्य निर्माण केले, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुध्दा देशातील नागरिकांना मतदानाचा अधिकार देऊन सूराज्य निर्माण केले.
प्रमुख अतिथी व व्य. प. सदस्य डॉ. मनिषा कोडापे म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांनी स्वत: शिक्षित होऊन महिलांना शिक्षित केले. फुले दाम्पत्यांनी त्यावेळी घरोघरी जावून शिक्षणाची जनजागृती केली. शाळा सुरू करुन शिक्षणाची मुहूर्तमेढ फुले दाम्पत्यांनी रोवली. आज त्यांच्यामुळेच प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया कार्यरत आहेत. स्त्री सशक्तीकरणाची खरी सुरुवात फुले दाम्पत्यांनीच केली असे सांगून संविधानाने आजच्या सावित्रीला समान संधी, दर्जा व रोजगाराच्या समान संधी प्रदान केल्यात, असेही त्या म्हणाल्या.
महापुरुषांच्या विचारांची तरुणांनी प्रेरणा घ्यावी – कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते
अध्यक्षीय भाषण करतांना कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते म्हणाले, महापुरुषांच्या जयंती करण्याईतकेच कार्य मर्यादित राहू नये. नववर्षाचा आपण मोठा जल्लोष करतो, परंतु ज्या महापुरुषांच्या प्रेरणेने आज आपण योग्यरित्या मार्गक्रमण करीत आहोत, त्या महापुरुषांच्या कार्याची तरुणांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन याप्रसंगी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. विद्यापीठामध्ये होणा-या अशा कार्यक्रमाप्रसंगी शहरातील गणमान्य नागरिकांची मोठ¬ा प्रमाणात उपस्थिती असते. विद्यापीठात उभारण्यात आलेल्या संविधान शिल्पामुळे तरुणांना प्रेरणा मिळाली आहे व याचा समाजामध्ये संदेश पोहचतो आहे. पश्चिमात्य देशांनाही महिला हक्कासाठी लढा द्यावा लागला. संविधानाने महिलांना हक्क दिलेत. समाजासाठी काही करावयाचेच आहे अशी तरुणांनी प्रतिज्ञा करावी व तीच महापुरुषांना आदरांजली ठरेल, असेही कुलगुरू म्हणाले.
संत गाडगे बाबा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, मेणबत्ती प्रज्वलन करुन विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकातून अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका मांडली. सूत्रसंचालन प्रा. अशोक जाधव यांनी तर आभार श्री उमेश सहारे यांनी मानले. व्याख्यान कार्यक्रमाला विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, विद्यापीठातील अधिकारी, शिक्षक, कर्मचारी, अमरावती शहरातील गणमान्य नागरिक, महिलावर्ग, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.