पत्रकारितेचा केंद्रबिंदू हा सर्वसामान्य माणूस असावा – डॉ. विलास नांदुरकर

पत्रकार हा समाजातील महत्त्वपूर्ण घटक असून तो समाजातील न्यूनतेला वृत्तपत्रातून जगासमोर मांडतो. पत्रकारितेच्या माध्यमातून सकारात्मकता निर्माण करून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करतो. लोकशाहीचे तीन स्तंभ आपापल्या स्तरावर काम करतात, परंतु चवथा स्तंभ तीनही स्तंभाचे कार्यमूल्यांकन समाजासमोर नेतो. पत्रकार हा जनता व शासन यातील महत्वाचा दुवा आहे. पत्रकार समाजाचा आरसा असून त्याचा केंद्रबिंदू हा सर्वसामान्य माणूस आहे, असे प्रतिपादन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदूरकर यांनी केले. विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागात पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अंबादास घुले, वक्ता म्हणून अमरावती शहरातील दै. अमरावती इव्हिनिंगच्या संपादक सौ. मधू बंग होते.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण वृत्तपत्र सुरू करुन समाजजागृतीचे कार्य हाती घेतले. त्याकाळी समाजप्रबोधन फार महत्वाचे होते. आजच्या पत्रकारितेत वेगवान बदल होत आहे. पिं्रट व डिजीटल मिडीयासह सोशल मिडीया प्लॅटफार्म जनतेसमोर आहे. पण या सर्वांमध्ये पिं्रट मिडीयाची विश्वासार्हता आजही टिकून आहे. वृत्तपत्र वाचूनच अऩेक नागरिकांच्या दिवसाची सुरुवात होते असेही ते म्हणाले. पत्रकारांच्या विविध समस्यां आहेत. त्या लक्षात घेऊन शासनाने पत्रकार कल्याणाच्या विविध योजना सुरू कराव्यात यावरही त्यांनी भर दिला.
प्रमुख वक्ता शहरातील ‘अमरावती इव्हिनिंग’ वृत्तपत्राच्या संपादक सौ. मधू बंग यांनी पत्रकारितेतील नि:स्पृहता आणि विश्वासार्हता ही पत्रकाराला आपल्या व्यवसायात नावलौकिक मिळून देण्यारी असते, ती काळजी त्याने घेतली पाहिजे, असे विचार मांडले. विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनात सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. वैभव मस्के, संचालन प्रा. राधिका खडके यांनी, तर आभार प्रा. भूषण परळीकर यांनी मानले. कार्यक्रमाला प्राध्यापकवृंद, विद्यार्थी बहुसंख्येन उपस्थित होते.