विशेष घटकांच्या व्यक्तींसाठी संवेदनशील आणि सहकार्यांची भूमिका ठेवावी – जिल्हाधिकारी सौरभ कटियार

समाजातील विशेष घटकांच्या व्यक्तींसाठी सर्व विभागांनी संवेदनशील आणि सहकार्यांची भूमिका ठेवावी. तसेच या विशेष घटकापर्यंत सर्व सामाजिक सुरक्षा तसेच लाभ यांची यशोचित माहिती पोहचविण्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रम तसेच माध्यमांचा प्रभावी वापर करावा , अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी दिल्या.
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या कार्यक्रमांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालय येथील महसूल भवन येथे श्री. कटियार यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. सभेच्या सुरवातीला 'आर्थिक वर्ष 2023-24 एचआयव्ही कार्यक्रमांचा आढावा ' पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुरेश आसोले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय स्तरावर झालेल्या जिल्हा एड्स पंधरवड्यानिमित्त आयोजित मोहिमेचा आढावा यावेळी घेण्यात आला. जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित केल्या जाण्याऱ्या विविध स्पर्धांचे पुरस्कार वाटप, जिल्ह्यात कार्यरत एकात्मिक समुपदेशन व तपासणी केंद्र यांच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. यात प्रथम क्रमांक 'एकात्मिक समुपदेशन व तपासणी केंद्र ग्रामीण रुग्णालय ,तिवसा ' तर व्दितीय क्रमांक 'जिल्हा स्त्री रुग्णालय अमरावती 'यांना देण्यात आला .
जिल्हात कार्यरत सामाजिक संस्थांच्या कामांचा आढावा घेऊन त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळ (देह विक्री करणाऱ्या स्त्रियांसाठी कार्यरत कार्यक्रम ) याने पुरस्कृत करण्यात आले. या सोबतच जिल्हास्तरीय सोशल मीडिया पोस्टर स्पर्ध्येमध्ये प्रथम क्रमांक आदित्य अरुण अकमार (शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय) , व्दितीय क्रमांक चक्रधर भागवत पंजारकर (शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय ), तृतीय क्रमांक जान्हवी प्रेमानंद पवार आणि उत्तेजनार्थ मोहमद शेख मोहमद अयाज यांना सन्मानित करण्यात आले. जिल्ह्याचा कामगिरीबाबत जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले तसेच पुढील आवश्यक कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या.
रक्तदान तसेच एचआयव्ही संबंधित इतर बाबी , क्षय रोग नियंत्रण कार्यक्रम, मुख रोग नियंत्रण कार्यक्रम, तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, 108 रुग्णावाहिका इत्यादींचा आढावा यावेळी घेण्यात आला.
वैद्यकीय अधीक्षक डॉ . विनोद पवार , डॉ प्रमोद पोतदार , इंडियन मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉ अनुपमा देशमुख यासह तसेच सामाजिक संस्थानांचे प्रतिनिधी हजर होते.