इंडियन स्टुडंन्ट कौन्सिलचा सावित्रीच्या लेकी आदर्श संशोधक पुरस्कार डॉ.अनिता पाटील यांना जाहीर

लोकशाही, समाजवाद धर्मनिरपेक्षता, विज्ञानभिमुखता व राष्ट्रवाद ही पंचसूत्री आदर्श मानून आणि माहिती व तंत्रज्ञान युगातील विद्यार्थी, शिक्षक व प्राध्यापक यांची समतावादी संघटना हे घोषवाक्य घेऊन स्थापन झालेल्या इंडियन स्टुडंट कौन्सिल व महाराष्ट्र संचालनालय पुरातत्व विभाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक, संशोधन, कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या कर्तृत्ववान महिलांना दरवर्षी सावित्रीच्या लेकी पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येत असते. यावर्षी संशोधन क्षेत्रात भरीव योगदान देणा-या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रा. डॉ. अनिता पाटील यांना इंडियन स्टुडंट कौन्सिल व महाराष्ट्र संचालनालय पुरातत्व विभाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा सावित्रीच्या लेकी आदर्श संशोधक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
प्रा. डॉ. अनिता पाटील यांनी संशोधनाच्या क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या नावे पाच पेटेंट असून त्यांची तीन पुस्तके, 59 शोध निबंध, 15 पुस्तकातील प्रकरणे, 10 शोध प्रकल्प आणि 15 इतर शोध निबंध प्रकाशित आहेत. तसेच त्या एम. फिल. आणि पीएचडी च्या संशोधन मार्गदर्शक असून आजवर त्यांच्या मार्गदर्शनात 10 संशोधक विद्याथ्र्यांनी पीएचडी पदवी तर 2 संशोधक विद्याथ्र्यांनी एम. फिल पदवी संपादन केली आहे. तसेच त्यांना किडनी स्टोनच्या हर्बल उपायाशी संबंधित संशोधनाचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. त्यांच्याकडे स्टोन एनालिसिसशी संबंधित सुमारे 3 पेटंट असून त्यांच्या या पेटंटचे नागपूरच्या एम एस अप्रोप्रिएट आयुर्वेदिक कंपनीद्वारे व्यावसायिकीकरण केले गेले आहे आणि हे औषध संपूर्ण भारतात विकले जात आहे. देश-विदेशातही त्यांनी आपले शोधनिबंध सादर केले आहेत. तसेच विद्यापीठातील विविध समित्यांमध्ये अध्यक्ष, सदस्य म्हणून त्या कार्यरत आहेत. अनेक चर्चासत्रात त्यांनी अतिथी व्याख्यान देवून विद्यार्थी, संशोधकांना मार्गदर्शन केले आहे. संशोधन क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा अभूतपूर्व असा ठसा संशोधन कार्याच्या माध्यमातून उमटवला आहे. त्यांच्या या संशोधन कार्याचा गौरव म्हणून संशोधन क्षेत्रातील राज्यस्तरीय सावित्रीच्या लेकी आदर्श संशोधक हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते त्यांना 18 जानेवारी, 2025 रोजी महात्मा फुले वाडा, समताभूमी, पुणे येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र – कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे व जीवतंत्रशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रसाद वाडेगावकर यांनी अभिनंदन केले आहे.