निम्म पेढी प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसन सुविधांवर नाराजी; एलगार सभेत प्रशासनाला इशारा

भातकुली तालुक्यातील निम्म पेढी प्रकल्पामुळे प्रभावित गावांतील नागरिक पुनर्वसनस्थळी जाण्यास तयार नाहीत. आज या विषयावर अमरावतीत विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने एलगार सभा घेण्यात आली.
“भातकुली तालुक्यातील पेढी नदीवर उभारण्यात येत असलेल्या निम्म पेढी प्रकल्पाच्या पुनर्वसन प्रक्रियेत मोठ्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. पुनर्वसन स्थळांवर पाणी, वीज, रस्ते, आरोग्यसेवा यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे प्रकल्पग्रस्त नागरिकांनी स्थलांतराला विरोध केला आहे. आज अमरावती येथे झालेल्या एलगार सभेत विदर्भ बळीराजा संघर्ष समितीचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी ठाम शब्दांत सांगितले की, ‘जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत गाव सोडणार नाही.’ या सभेत पाचही गावांचे सरपंच आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला. पुनर्वसन प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलण्याची मागणी या वेळी करण्यात आली.” “प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या प्रशासनाने मान्य केल्या नाहीत, तर हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.