राष्ट्रीय युवा दिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन
अमरावती, १२ जानेवारी २०२५: आज राष्ट्रीय युवा दिवसाच्या अनुषंगाने केंद्रीय संचार ब्युरो अमरावती, श्रीरामकृष्ण विवेकानंद समिती अमरावती, संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती आणि विविध महाविद्यालये यांच्या संयुक्त प्रयत्नाने सकाळी प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. यावेळी लहान मुलांनी विविध महापुरुषांच्या वेशभूषा परिधान करून कार्यक्रमात रंगत आणली. तसेच, युवा सहभागी स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणादायक घोषणांनी परिसरातील नागरिकांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमाला डॉ अविनाश असणारे, कुलसचिव संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, डॉ अरविंद देशमुख प्राचार्य ,टोंपे महाविद्यालय, माजी नगरसेवक प्रदीप हिवसे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
तसेच, जिल्हा प्रशासन, अमरावती आणि चैतन्य व्हॉलीबॉल ग्रुप अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शहरातील व आसपासच्या परिसरातील विविध संघांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या विजेत्यांना केंद्रीय संचार ब्युरो अमरावती आणि चैतन्य व्हॉलीबॉल ग्रुप अमरावती यांच्या वतीने पारितोषिके प्रदान करण्यात आली.
युवकांच्या प्रेरणादायक कार्यामुळे आजचा दिवस यथार्थ अर्थाने उत्सवमय बनला आणि युवा शक्तीला एक नवा संदेश मिळाला.