नागरिकांना अपेक्षित सुविधांच्या गतीमान पूर्ततेवर आयुक्त सचिन कलंत्रे यांचा आढावा बैठकीत विशेष भर

स्वच्छता ही अमरावती शहरासाठी सर्वाधिक प्राधान्यची बाब असून शहरातील जो परिसर अमरावती महानगरपालिकेच्या अखत्यारित येत नाहीत मात्र त्याचा शहर स्वच्छतेवर पर्यायाने स्वच्छतेच्या मानांकनावर परिणाम होतो, अशा विविध भागांतील स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. हे भाग नियमित स्वच्छ असणे ही शहर स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब असून याविषयी संबधित प्राधिकरणांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करीत त्यादृष्टीने ठोस कार्यवाही करण्याचे व याविषयी सातत्याने पाठपुरावा करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त डॉ.मेघना वासनकर, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त योगेश पिठे व इतर विभागप्रमुख उपस्थित होते. यावेळी विभागप्रमुखांनी गतआठवड्यात केलेली कामे आणि पुढील दिवसांत करायची कामे, यावर चर्चा झाली.
महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागामार्फत सुरु असलेल्या कामांचा व अपेक्षित कामांचा सविस्तर आढावा घेतांना सर्व विभागप्रमुखांनी आपापल्या विभागाच्या कामांची उद्दिष्ट्ये व ती पूर्ण करण्याबाबतचे नियोजन सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
नागरिकांना सुलभ रितीने सर्व लोकसेवा ऑनलाईन उपलब्ध होण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना देत ई ऑफिस तसेच इआरपी प्रणालीही संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याची कार्यवाही करावी असे त्यांनी निर्देशित केले. महानगरपालिकेच्या तक्रार निवारण प्रणालीव्दारे (Public Grievance System) प्राप्त तक्रारींचे निराकरण विहित वेळेत होत असल्याबाबत प्रत्येक विभागप्रमुखाने खातरजमा करुन घ्यावी व प्रत्येक आठवडयात अतिरिक्त आयुक्तांमार्फत त्याचा आढावा घेण्यात यावा अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या.
महानगरपालिकेच्या विनावापर असलेली मार्केट, समाजमंदिरे व इतर सेवा इमारती वापरात आणण्याच्या दृष्टीने गतीमान पावले उचलावीत व त्याचा कालबध्द कृती आराखडा सादर करावा असेही निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले. यापुढील काळात उद्यानांची कामे अभिनव संकल्पना (Theme Garden) राबवून करावीत व पर्यटन स्थळ म्हणून त्यांचा विकास होईल याकडे विशेष लक्ष द्यावे असे त्यांनी सांगितले. उद्यांनामध्ये कंपोस्टींग व्यवस्था, शौचालय व्यवस्था व पिण्याच्या शुध्द पाण्यासाठी कुलर व्यवस्था उपलब्धा करुन देण्यावर भर द्यावा अशाही सूचना आयुक्तांनी केल्या.
शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण पूर्ण करुन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ठोस कृती करावी त्याचप्रमाणे विद्यार्थ्याची सर्व माहिती शासन पोर्टलवर संग्रहित करण्याच्या कामाला गती देऊन प्रत्येक विद्यार्थ्याचा अपार आयडी तयार करुन घ्यावा असे निर्देश देतानाच आयुक्तांनी त्यासोबतच विद्यार्थ्याची अभ्यासातील प्रगती, त्याचे छंद, त्याचा कल, त्याचे व्यक्तीमत्व याबाबत मूल्यमापन होईल अशाप्रकारे डिजीटल माहिती उपलब्ध करुन ठेवावी असे निर्देश दिले.
नियोजित रुग्णालये व आरोग्य केंद्रे यामध्ये आवश्यक सुविधांचे नियोजन करावे व त्याचा आराखडा तयार करुन पूर्णत्वाचा कालावधी निश्चित करावा अशाही सूचना आयुक्तांमार्फत देण्यात आल्या. प्रदूषण प्रतिबंधाच्या नियमावलीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यावर भर देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले तसेच अमरावती शहराचा आर्थिक नियोजन आराखडा तयार करावा व पर्यावरण कृती आराखडा तयार करावा असेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.