गरिबांवर अन्याय का? अमरावतीत ५० रुपयांत झुणका-भाकर पुरवणाऱ्या दुकानांवर अतिक्रमण कारवाई

“अमरावती शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत असताना, गरीबांसाठी पन्नास रुपयांत झुणका-भाकर पुरवणाऱ्या दुकानांवरच प्रशासनाची कारवाई का? गरिबांच्या रोजगारावर घाला घालणाऱ्या या कारवाईमागे कोण आहे?
अमरावती शहरात अतिक्रमणावर कारवाई करण्याच्या नावाखाली गरीब नागरिकांच्या रोजगारांवर मोठा घाला घालण्यात आला आहे. न्यायालयासमोर गेल्या अनेक वर्षांपासून ५० रुपयांत झुणका-भाकर पुरवणाऱ्या बेबी गडलिंग यांच्या खानावळीवर प्रशासनाने कारवाई करत संपूर्ण दुकान हटवले आहे.
बऱ्याच काळापासून ही खानावळ नागरिकांसाठी माफक दरात अन्न पुरवत होती. प्रशासनाने कारवाई करून दुकान हटवल्यानंतर त्या आता उकळ्यावर स्वयंपाक करून अन्न पुरवत आहेत. त्यांच्या मते, “शहरातील मोठ्या हॉटेलांवर कोणतीही कारवाई होत नाही, मग गरीबांवरच अन्याय का?”
गेल्या अनेक वर्षांपासून गडलिंग या महिलांना रोजगार देत होत्या आणि महानगरपालिकेचे बाजार परवाना शुल्कही नियमित भरत होत्या. तरीही, अतिक्रमण विभागाने कोणतीही तडजोड न करता कारवाई केली. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, प्रशासनाने गरिबांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे.
जिल्हा परिषद कार्यालयासमोरील हॉटेलवर कारवाई केल्यानंतर गडलिंग यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहोपात्रा यांच्याकडे सुरक्षित जागेची मागणी केली होती. त्यावेळी त्यांना जागा देण्याचे आश्वासन मिळाले, परंतु ते अद्याप पूर्ण झालेले नाही.
“गरिबांना न्याय मिळणार का? शहरातील मोठ्या हॉटेलांवर कारवाई कधी होणार? प्रशासन गरीबांसाठी जागा उपलब्ध करून देणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.