AmravatiLatest NewsLocal News
जिजाऊंचे संस्कार आणि कर्तृत्व आजच्या स्त्रीचे आदर्श असले पाहिजे – क्षिप्रा मानकर

जिजाऊंचे संस्कार, शौर्य आणि राजनीती धुरीणत्व अतिशय देदिप्यमान आहे. जिजाऊंच्या जीवनात प्रचंड संकटे आली, परंतु त्या खचल्या नाहीत. हिमतीने प्रत्येक संकटावर मात करीत त्यांनी शिवबाला चरित्र आणि चारित्र्यसंपन्न बनविले. जिजाऊमधील तीच हिंमत, संस्कार, करारीवृत्ती आणि सकारात्मक कर्तृत्व आजच्या स्त्रीचे आदर्श असले पाहीजे, असे प्रतिपादन विख्यात निवेदिका व वक्ता क्षिप्रा मानकर यांनी केले. त्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातंर्गत एम. ए. छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन अभ्यासक्रम आयोजित जिजाऊ जयंत्ती निमित्ताने प्रमुख वक्ता म्हणून बोलत होत्या. विचारपीठावर कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, शहराच्या आमदार सौ. सुलभाताई खोडके, विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील उपस्थित होते.
क्षिप्रा मानकर पुढे म्हणाल्या, संस्कारक्ष्म वयात आईकडून होणारे संस्कार आणि मिळणारे शौर्याचे धडे यातून बालकाचे व्यक्तिमत्व विकसित होत असते. हेच काम राजमाता जिजाऊ यांनी केले. त्यांची राजनीती, धाडस आणि शौर्य यातून शिवाजी महाराज घडले. आजच्या स्त्रीने कर्तृत्वाची उंची गाठतांना जिजाऊ यांचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी उपस्थित भगीनींना केले.
अध्यक्षीय भाषण करतांना कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी सत्य बोलणे आणि बरे बोलणे यातील फरक समजावून सांगतांना जिजाऊंचा सत्यनिष्ठपणा, कणखरपणा खया अर्थाने स्त्री सक्षमीकरणासाठी महत्वाचा आहे. तो आजच्या भगीनींनी अंगीकारावा असे आवाहन केले. प्रास्ताविक डॉ. मंजुषा बारबुध्दे, संचालन डॉ. अश्विनी राऊत, तर आभार प्रा. वृषाली जवंजाळ यांनी मानले.यावेळी अमरावती शहरातील गणमान्य नागरिक, विद्यापीठातील अधिकारी, विविध प्राधिकरणाचे प्रतिनिधी, विभागातील प्राध्यापकस विद्यार्थी उपस्थित होते.