LIVE STREAM

Vidarbh Samachar

विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता! किमान तापमानात वाढ

 राज्यातील अधिकांश भागात थंडीचा जोर हळूहळू ओसरू लागला आहे. विदर्भातदेखील किमान तापमानात चढउतार होत आहे. थंडी जाणवत असली तरीही गेल्या काही दिवसांपासून किमान तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा अधिकच आहे.
   उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहाचा परिणाम म्हणून एकीकडे राज्यात पहाटे गारवा आणि धुक्याची चादर दिसून येत आहे. तर दुसरीकडे किमान तापमानात वाढ झाली असून ढगाळ हवामानामुळे हलक्या पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती पंजाब आणि त्याला जोडून पाकिस्तानच्या परिसरात आहे त्यामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण आहे. तर दक्षिणेतही जोरदार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावरदेखील होत आहे.
  गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. तर येत्या २४ तासात किमान तापमानात पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पश्चिम हिमालयीन भागात नव्याने पश्चिमी चक्रावात तयार झाला असून पुढील चार दिवस हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाबसह महाराष्ट्रात विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित महाराष्ट्रात हवामान कोरडे राहणार असून तापमानात काहीशी वाढ होण्याचा अंदाज आहे.
  राज्यात गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमान कमी झाले आहे, तर विदर्भात किमान तापमानात चढउतार दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने चढउतार होत असून अवकाळी पावसाला पोषक हवामान तयार झाल्याने शेतकरी धास्तावले होते. हवामान खात्यानेदेखील महाराष्ट्रातील विदर्भात पावसाचा इशारा दिला होता. वातावरणात उकाडाही जाणवत होता, तर मध्येच थंडीसुद्धा जाणवत होती. पहाटे हलका गारवा आणि धुकेही होते.
राज्यात मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागात किमान तापमान सामान्य तापमानाच्या तुलनेत अधिक नोंदवले जात आहे. पुणे, नाशिक, मुंबई भागात पारा १५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. तर मराठवाड्यातदेखील किमान तापमान २० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. येत्या २४ तासात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. साधारण दोन अंश सेल्सिअसने किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यतादेखील आहे.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!