Crime NewsLatest Newsmelghat
मेळघाटात अंधश्रद्धेचा कहर: जादूटोण्याच्या संशयावरून वृद्ध महिलेची नग्न धिंड

पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील रेहट्याखेडा गावात घडली आहे. जादूटोण्याच्या संशयावरून 77 वर्षीय वृद्ध महिलेची नग्न धिंड काढण्यात आली. या घटनेने मानवतेला हादरवून सोडले आहे. पोलीस पाटलाचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप होत आहे.
मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील रेहट्याखेडा गावात जादूटोण्याच्या संशयावरून एका 77 वर्षीय वृद्ध महिलेची नग्न धिंड काढण्यात आली. या घटनेदरम्यान संपूर्ण गाव बघ्याच्या भूमिकेत राहिला. काढणी नंदराम शेलूकर असे पीडित महिलेचे नाव असून, तिने सहा जानेवारी रोजी चिखलदरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी केवळ मारहाणीचा गुन्हा नोंदवला.
पीडित महिलेचे मुलं, राजकुमार शेलूकर व शामू शेलूकर, यांनी पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली. यावेळी त्यांनी पोलीस पाटलावर त्यांच्या शेतात अंगणवाडी बांधल्याचा गंभीर आरोप केला.
पोलिसांनी सुरुवातीला अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंदवला नाही, मात्र पोलीस अधीक्षकांनी संपूर्ण चौकशी करून संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल, असे आश्वासन दिले आहे.
ही घटना महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला काळिमा फासणारी आहे. अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, जेणेकरून अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. आता या प्रकरणातील चौकशी व पुढील न्याय प्रक्रिया कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे