कोलकाता बलात्कार-हत्येप्रकरणी आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा

: कोलकाता बलात्कार-हत्येप्रकरणी आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या सियालदाह न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. आरजी कर बलात्कार-हत्येप्रकरणी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा तसेच 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला. कोलकात्यातील आर.जी.मेडीकल कॉलेजमध्ये 31 वर्षीय ट्रेनी महिला डॉक्टरवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली होती. यावर आता न्यायालयाने आपला निर्णय सुनावला आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉयला दोषी ठरवण्यात आले आहे. भारतीय न्याय संहीता कलम 64 (बलात्कारासाठी शिक्षा), 66 (मृत्यूचे कारण बनल्यासाठी शिक्षा) आणि 103 (हत्येसाठी शिक्षा) नुसार शिक्षा सुनावण्यात आली आहे.
आतापर्यंत काय झालं?
9 ऑगस्ट: कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळला. कॉलेजच्या सेमिनार हॉलच्या तिसऱ्या मजल्यावर मृतदेह आढळला.
10 ऑगस्ट: कोलकाता पोलिसांचा नागरी स्वयंसेवक संजय रॉय याच्यावर संशय आला आणि त्याला ताबडतोब ताब्यात घेण्यात आले. या दिवसापासून पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांचे निदर्शने सुरू झाले.
12 ऑगस्ट: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता पोलिसांना हे प्रकरण लवकरात लवकर सोडवण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्यांनी पोलिसांना 7 दिवसांची मुदत दिली. जर या वेळेत प्रकरण सोडवले नाही तर ती हे प्रकरण सीबीआयकडे सोपवेल, असेही त्यांनी सांगितले. त्याच दिवशी मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करण्यात आला. आरजी कारचे प्राचार्य संदीप घोष यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
13 ऑगस्ट: कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली. हे प्रकरण अत्यंत भयानक असल्याचे म्हटले आणि प्रकरण सीबीआयकडे सोपवले. न्यायालयाने आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांना कामावर परतण्याची विनंतीही केली.
14 ऑगस्ट: सीबीआयने 25 सदस्यांची टीम तयार केली. एक फॉरेन्सिक टीमदेखील स्थापन करण्यात आली. दरम्यान शेकडो विद्यार्थी, सामाजिक संघटना आणि सामान्य लोक रस्त्यावर उतरले आणि या घृणास्पद गुन्ह्याचा निषेध करण्यात आला.
15 ऑगस्ट: रात्रीच्या वेळी एका जमावाने रुग्णालयात घुसून आपत्कालीन विभाग आणि नर्सिंग स्टेशनची तोडफोड केली. याच्या निषेधार्थ, इंडियन मेडिकल असोसिएशनने 17 ऑगस्ट रोजी देशभरात 24 तास सेवा बंद ठेवण्याची हाक दिली आहे.
16 ऑगस्ट: पोलिसांनी तोडफोडीच्या आरोपींना अटक करण्यास सुरुवात केली आणि दीड डझनहून अधिक लोकांना अटक केली.
18 ऑगस्ट: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण तोडफोडी प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आणि 20 ऑगस्ट ही सुनावणीची तारीख निश्चित केली.
19 ऑगस्ट: सीबीआयने संदीप घोष यांची चौकशी केली. सीबीआयला आरोपीची पॉलीग्राफ चाचणी करण्याची परवानगी मिळाली.
20 ऑगस्ट: सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने डॉक्टरांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी राष्ट्रीय प्रोटोकॉल तयार करण्याचे निर्देश दिले. याअंतर्गत, 10 सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि कोलकाता पोलिसांना स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले.