LIVE STREAM

Latest NewsMaharashtra

ठाणे ते बोरिवली प्रवास 12 मिनिटांत पूर्ण होणार, बहुप्रतीक्षित प्रकल्पाचा मार्ग मोकळा

  मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील प्रवास आणखी सुकर व्हावा यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्यातीलच एक प्रकल्प म्हणजे ठाणे-बोरीवली दुहेरी बोगदा. आता या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पासाठी बोरीवली बाजूकडील उर्वरित 3,658 चौ.मी जागा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने एमएमआरडीएकडे हस्तांतरीत केली आहे. त्यामुळं या प्रकल्पातील अडथळे दूर झाले आहेत. आता लवकरच या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे. 
  ठाणे-बोरीवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून 11.85 किमी लांबीच्या मार्गाची उभारणी करण्यात येत आहे. या मार्गावर 10.25 किमी लांबीच्या बोगद्याचा समावेश आहे. नॅशनल पार्कच्या पोटातून हे दोन बोगदे जाणार आहेत. जून 2023मध्ये या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहेत. या बोगद्यामुळं घोडबंदर रोडची वाहतूक कोंडी कमी होणार आहे.     
सध्या या प्रकल्पाचे ठाण्याच्या बाजूकडील काम सुरू झाले आहे. तसंच, बोगद्याच्या भुयारीकरणासाठी शाफ्ट उभारणीचे काम सुरू केले आहे. मात्र याचबरोबर बोरिवली बाजूकडील भुयारीकरणापूर्वीची प्राथमिक कामेही सुरू झालेली नाहीत. या प्रकल्पासाठी 18,838 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. 

कसा असेल हा प्रकल्प?
ठाणे ते बोरीवली दरम्यानचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. एमएमआरडीए ठाणे- बोरीवली दरम्यान दुहेरी बोगदा बांधणार आहे. सध्या ठाण्याहून बोरीवलीला जाण्यासाठी एक ते दीड तासांचा वेळ लागतो. तसंच, कधी कधी वाहतूक कोंडीचा सामनादेखील करावा लागतो. मात्र, या प्रकल्पामुळं हा प्रवास अगदी 10 मिनिटांवर येणार आहे. बोगद्याच्या दोन्ही बाजूस 2-2 मार्गिकांसह आपत्कालीन मार्ग आहे. प्रत्येकी 300 मीटर पादचारी क्रॉस पॅसेज आणि प्रत्येकी 2 पादचारी क्रॉस पॅसेजनंतर वाहन क्रॉस पॅसेजची तरतूद करण्यात येणार आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानांतर्गत ठाणे आणि बोरिवली दरम्यान प्रस्तावित 11.8 कि.मी. लांबीचा दुहेरी बोगदा हा भारतातील शहरी भागांतर्गत सर्वात लांब बोगद्यांपैकी एक असेल. मूळ बोगद्याची एकूण लांबी १०.२५ किमी असेल. हा ठाण्याच्या बाजूने सुरू होऊन बोरीवली येथे NH8 वर संपतो. ठाणे-बोरीवली या थेट जोडणीमुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कमी होईल तसेच वायू आणि ध्वनी प्रदूषण कमी होण्यास मदत होऊन संबंधित क्षेत्राच्या वाढीस चालना मिळेल. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पर्यावरण घटकांचे संरक्षण करण्यासाठी सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर करुन या प्रकल्पाचे बांधकाम करणे प्रयोजित आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बोरिवली ते ठाणे अंतर १२ मिनिटांत पूर्ण पार करणे शक्य होईल. तसेच, सुमारे १ लाख नागरिकांचा प्रवास त्रासमुक्त होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सुमारे १,५०,००० मेट्रिक टन प्रति वर्ष कार्बन उत्सर्जनात घट होऊन सुमारे १,००,००० PCUs (Passenger Car Units) या भूमिगत बोगद्याचा वापर करतील. सदर प्रकल्पातील बोगद्याचा भाग हा संरक्षित वन क्षेत्रातुन जात असल्याने अत्याधुनिक टनेल बोरिंग मशीन्स (Tunnel Boring Machine) च्या सहाय्याने बोगद्याचे खोदकाम करण्यात येणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!