दर्यापूरमध्ये सहा वर्षीय चिमुकलीवर अमानुष अत्याचार; रुग्णालयात उपचारांमध्ये विलंब, कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी

“दर्यापूर पोलीस स्टेशन हद्दीत सहा वर्षीय चिमुकलीवर अमानुष अत्याचाराची घटना घडली आहे. या प्रकरणानंतर तिला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु या चिमुकलीला मिळालेल्या वागणुकीने आरोग्य व्यवस्थेतील बेजबाबदारपणाचा एक भयंकर चेहरा उघड केला आहे.तिच्या प्रकृतीबाबत तात्काळ उपचाराची गरज असतानाही, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तिच्या उपचारांमध्ये विलंब केला. चिमुकली गंभीर वेदनांमध्ये तडफडत असताना, तिला जवळपास दीड तास रुग्णालयात बसून ठेवण्यात आले. नातेवाईक वारंवार विनंती करत होते, तरीही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष झाले. इतकेच नव्हे, तर या चिमुकलीला आधीच बायपास करून इतर रुग्णांना प्राधान्य दिले जात असल्याचे समोर आले आहे.
रुग्णालयातील हलगर्जीपणाला आळा घालण्यासाठी भीम ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखेडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने हस्तक्षेप केला. मात्र, ड्युटीवर असलेल्या स्टाफ नर्स जयमाला तंतरपाळे आणि सिस्टर अंजुम यांनी वानखेडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी उद्धट वागणूक केली. ही परिस्थिती आणखीनच चिघळली, आणि अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतरच या चिमुकलीवर उपचाराला सुरुवात झाली.या निषेधार्थ 20 जानेवारी रोजी भीम ब्रिगेड संघटनेने जिल्हा शल्यचिकित्सक दिलीप सौंदळे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. संघटनेने या अमानवीय वर्तनासाठी जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. आंदोलनाचा परिणाम म्हणून, नर्स जयमला तंतरपाळे यांना तत्काळ निलंबित करण्यात आले. तसेच, सिस्टर अंजुमवर लवकरच कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
ही घटना केवळ एका चिमुकलीवरील अत्याचारापुरती मर्यादित नाही; ती आपल्या आरोग्य व्यवस्थेतील ढिसाळपणाचे आणि माणुसकीच्या अभावाचे भयंकर उदाहरण आहे. पीडित मुलीच्या वेदनांकडे दुर्लक्ष करून प्रशासनाने केवळ आपले अपयश दाखवले नाही, तर मानवतेलाही काळिमा फासला आहे.”