LIVE STREAM

International News

अध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच ट्रम्प सरकारचा झटका, अमेरिकन नागरिकत्वाबद्दल मोठा निर्णय

वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जन्मसिद्ध नागरिकत्व (birthright citizenship) रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. मंगळवारी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच ट्रम्प यांनी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. त्यानुसार, तात्पुरता वर्क व्हिसा किंवा स्टुडण्ट अथवा टुरिस्ट व्हिसा धारकांनी जन्म दिलेल्या बालकांना आता थेट अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार नाही.
“अमेरिकन नागरिकत्वाचा अर्थ आणि मूल्याचे संरक्षण” या आदेशात असे नमूद केले आहे की अमेरिकेच्या भूमीवर जन्मलेल्या ज्या बाळांचे स्थलांतरित पालक यूएस नागरिक नाहीत, त्यांना ट्रम्प प्रशासन यापुढे आपोआप अमेरिकन नागरिकत्व बहाल करणार नाही. आपल्या पहिल्या कार्यकाळातच ट्रम्पनी याबाबत इशारा दिला होता, परंतु त्याचे पालन केले नव्हते. तात्पुरत्या वर्क, विद्यार्थी किंवा पर्यटक व्हिसावर देशात असलेल्या गैर-नागरिक पालकांच्या पोटी जन्मलेल्या मुलांना या निर्णयामुळे थेट नागरिकत्व प्रतिबंधित झाले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी अमेरिकेचे ४७वे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. अध्यक्ष म्हणून केलेल्या पहिल्याच भाषणात त्यांनी अमेरिकेचा सुवर्णकाळ आतापासून सुरू होत असल्याचे सांगत अमेरिकी नागरिकांच्या समृद्धीसाठी इतर देशांवर कर लावण्याचा निर्धार व्यक्त केला.
ट्रम्प यांच्यासोबत जे. डी. व्हान्स यांनी उपाध्यक्षपदाची शपथ घेतली. चार वर्षांनंतर पुन्हा सत्तेत परतलेल्या ट्रम्प यांनी शुल्क, ऊर्जा, इमिग्रेशनसह अनेक क्षेत्रांत अमेरिकेची धोरणे बदलण्याचे आश्वासन दिले आहे. ‘अभिमान वाटावे असे समृद्ध आणि मुक्त राष्ट्र निर्माण करणे हे सर्वोच्च प्राधान्य असेल. अमेरिकी न्याय विभागाचे क्रूर, हिंसक आणि अयोग्य सशस्त्रीकरण संपुष्टात येईल,’ असे ट्रम्प यांनी अधोरेखित केले. यावेळी त्यांनी आपल्यावर झालेल्या हल्ल्याचाही उल्लेख केला. ‘अमेरिकेला पुन्हा महान बनवण्यासाठी ईश्वराने मला जीवनदान दिले,’ असे ते म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!