जिल्हास्तरीय हॅकेथॉन स्पर्धेत मनपा मराठी शाळा क्रमांक 18 जिल्ह्यातून प्रथम

स्टार्स प्रकल्पांतर्गत हॅकेथॉन या उपक्रमांतर्गत इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 21 व्या शतकातील कौशल्याची रुजवणूक करण्यासाठी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेबाबत जागृती करण्यात येणार आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील 347 शाळांनी नोंदणी केली होती. त्यामधून एकूण 84 शाळांची जिल्हास्तरीय प्रदर्शनीकरिता निवड करण्यात आली होती.
त्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय हॅकेथॉन प्रदर्शनी 2024 -25 जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था टोपे नगर अमरावती येथे आयोजित आली होती.त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था या गटातून मनपा उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 18 प्रवीण नगर या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शाळेची निवड करण्यात आली.
निवडीबाबत मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन गौरविण्यात आले.
सदर उपक्रमात शाळेतील शिक्षिका कु वैशाली महाजन व इयत्ता सातवीचे अमान अन्सारी व राज गुळदे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.मॉडेल तयार करण्याकरीता शाळेचे मुख्याध्यापक श्री सुधीर धोत्रे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच गौरव परणकर यांनी विशेष सहकार्य केले. त्यांच्या या यशाबद्दल मा. शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम यांनी शाळेचे अभिनंदन केले तसेच महानगरपालिकेतील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेच्या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
तसेच या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी संबंधित शिक्षिका व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.