नंदनवन पोलिसांची धडक कारवाई – 52 ग्रॅम मेफेड्रोन पावडरसह 6.57 लाखांचा मुद्देमाल जप्त

“नागपूर शहरातील नंदनवन पोलिसांनी मोठी कारवाई करत, हसनबाग कब्रस्तान गल्लीतील एका संशयित आरोपीला अटक केली आहे. NDPS कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, आरोपीकडून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाहिजे आरोपी अद्याप फरार असून, पोलिसांचा त्याच्या मागावर शोध सुरू आहे.”
“दि. 22 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 7:45 ते रात्री 10:30 या वेळेत नंदनवन पोलीस ठाण्याच्या NDPS युनिट 5 पथकाने हसनबाग कब्रस्तान गल्ली नंबर 3 येथे गस्त घालत असताना एका संशयित आरोपीची झडती घेतली. आरोपी मुजफ्फर रमजान अली, वय 48 वर्षे, याच्याकडून 52 ग्रॅम एमडी मेफेड्रोन पावडर, एक मोबाईल, दोन मोटारसायकल आणि रोख रक्कम मिळून एकूण 6,57,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पंचनामा करून आरोपीला पुढील कारवाईसाठी नंदनवन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
तपासादरम्यान, याप्रकरणातील प्रमुख पाहिजे आरोपी राजा डवका सय्यद हर्षद अली हा अद्याप फरार असून, तो पूर्वीही अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे. यामध्ये NDPS कायद्याखाली तसेच आयपीसी आणि आर्म्स अॅक्टच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. नंदनवन पोलीस ठाण्यात आधीच आरोपीविरोधात NDPS ऍक्टच्या विविध कलमांखाली गुन्हे नोंदवले गेले असून, पोलिसांचा तपास सुरू आहे.”
“पोलिसांची ही कारवाई नागपूर शहरातील अमली पदार्थांच्या रॅकेटवर मोठा आघात मानली जात आहे. मात्र, या प्रकरणातील पाहिजे आरोपी राजा डवकाला पकडणे पोलिसांसाठी मोठे आव्हान आहे.