शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ नांदेडच्या शेतकऱ्यांचे आंदोलन 27 जानेवारीला
वर्धा ते गोवा असा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक शेतकरी या महामार्गाच्या विरोधात आवाज उठवत आहेत, तर काही शेतकरी याला सक्रिय पाठिंबा दर्शवत आहेत. विशेषतः नांदेड जिल्ह्यात दोन गटांत विभागलेले शेतकरी आता वेगवेगळ्या पद्धतीने आपले मत मांडत आहेत. याच पार्श्वभूमीवर 27 जानेवारी रोजी महामार्गाच्या समर्थनार्थ मोठे आंदोलन होणार आहे.
वर्धा ते गोवा असा शक्तीपीठ महामार्ग 12 जिल्ह्यांतून जाणार आहे. या महामार्गासाठी शेतकऱ्यांची जमीन संपादित होणार आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. मात्र नांदेड जिल्ह्यातील काही शेतकरी या महामार्गाला पूर्ण पाठिंबा देत आहेत. आज नांदेडच्या हदगाव तालुक्यात महामार्गाच्या समर्थनार्थ बैठक घेण्यात आली. या बैठकीत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करून सरकारच्या निर्णयाला आपला पाठिंबा दर्शवला. याचबरोबर 27 जानेवारी रोजी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालया समोर महामार्गाच्या समर्थनार्थ 12 जिल्ह्यांतील शेतकरी एकत्र येऊन आंदोलन करणार आहेत. दुसरीकडे, 24 जानेवारी रोजी महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांच्या एका गटाचे आंदोलन देखील नियोजित आहे. त्यामुळे नांदेडमध्ये सध्या हा विषय चांगलाच तापलेला दिसत आहे.
शक्तीपीठ महामार्गावरून दोन गटांमध्ये निर्माण झालेली फूट शेतकऱ्यांमध्ये मतभिन्नतेचं चित्र उभं करत आहे. 27 जानेवारीला होणाऱ्या आंदोलनाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. हा प्रकल्प कशाप्रकारे पुढे जातो, याकडे सर्वांचे लक्ष राहील.