इअरफोनमुळे आवाज आला नाही, ट्रेनच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

मोबाईलचा अतिवापर एका विद्यार्थिनीच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कानातील इअरफोनमुळे ट्रेनचा आवाज न आल्याने ट्रेनच्या लागलेल्या धडकेत एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पालघरमध्ये घडली आहे. पश्चिम रेल्वेच्या पालघर मधील सफाळे रेल्वे स्थानकाजवळ रूळ ओलांडताना माकने गावातील वैष्णवी रावल या विद्यार्थिनीला राजधानी एक्सप्रेसने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला.
माकने जवळ पश्चिम रेल्वेवर उड्डाणपूल नसल्याने येथील रहिवासी धोकादायक पद्धतीने रेल्वे रूळ ओलांडतात. त्यातच अनेक विद्यार्थ्यांच्या कानात नेहमीच इअरफोनमुळे असल्याने त्यांचं येणाऱ्या गाड्यांकडे देखील लक्ष नसतं यातूनच हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. वैष्णवीच्या या मृत्यूनंतर परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, इअरफोन घालून रुळ ओलांडणाऱ्या वैष्णवी रावल या 16 वर्षीय विद्यार्थिनीचा राजधानी एक्सप्रेसची धडक बसली या घटनेमध्ये तिचा जागीच मृत्यू झाला आहे. पालघरच्या सफाळे येथे ही घटना घडली आहे. वैष्णवी रावल ही माकणे येथे राहत होती. वैष्णवी काल (गुरूवारी, ता- 24) कानात ईयरफोन घालून रेल्वे रूळ ओलांडत होती. याच दरम्यान गुजरातकडे जाणारी राजधानी एक्सप्रेस भरधाव वेगाने आली होती. मात्र कानात ईयरफोन घातल्यामुळे तिला ट्रेनचा आवाज ऐकू आला नाही आणि तिला रेल्वेची जोरदार धडक बसली. एक्सप्रेसच्या धडकेत वैष्णवीचा जागीच मृत्यू झाला. वैष्णवी रावल दहावीमध्ये शिकत होती.
दोन महिन्यांतील दुसरी अपघाताची घटना
दरम्यान, सफाळे स्थानकामध्ये कानात ईयरफोन घालून रस्ता ओलांडताना अपघात होण्याची ही दोन महिन्यांतील दुसरी घटना आहे. या अगोदर 7 डिसेंबर रोजी या ठिकाणी एका तरुणाचा कानात ईयरफोन घालून रेल्वे रूळ ओलांडताना अशाच प्रकारे अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर ग्रामस्थांनी रेल्वे फाटकाजवळ पादचारी पुल नसल्याने अनेकांचे जीव जात आहेत,यासाठी रेल्वे प्रशासनाने पश्चिमेकडील येण्या-जाण्यासाठी रेल्वे फाटकात पादचारी पुल बांधावा अशी मागणी करत माकणे ग्रामस्थ आक्रमक झाले.
आजकाल लहानांपासून अगदी वयोवृध्दांपर्यंत सर्वजण ईयरफोन घालून दररोजचा प्रवास करतात. त्यावेळी आजुबाजूला रस्ते ओलांडताना, रेल्वे रूळ ओलांडताना येणाऱ्या वाहनांचा, रेल्वे गाडीचा त्यांना आवाज येत नाही त्यामध्ये त्यांचा जीव जातो. या गोष्टी टाळून रस्ते ओलांडताना, रेल्वे रूळ ओलांडताना आजुबाजूला पाहूनच प्रवास करणे गरजेचे आहे.