Latest Newsmelghat
धारणीतील अस्वल हल्ल्यात म्हशीचे पिल्ले मृत, कुत्र्याचे पिल्ले अपहरण; वन विभागाची शोधमोहीम सुरू

धारणी शहरातील सिताराम नगरी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. रहिवासी कॉलनीच्या शेजारील शेतात अस्वलाच्या हल्ल्यात एका म्हशीच्या पिल्लाचा मृत्यू झाला असून एका कुत्र्याच्या पिल्लाला उचलून अस्वल फरार झाले आहे. या घटनेमुळे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभाग सतर्क असून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
"धारणीच्या सिताराम नगरी परिसरात असलेल्या शेतांमध्ये रात्रीच्या वेळी एका अस्वलाने धुमाकूळ घातला. शेतात गायी-गुरांना चारण्यासाठी ठेवलेल्या एका गरीब शेतकऱ्याच्या म्हशीच्या पिल्लावर अस्वलाने हल्ला केला. या हल्ल्यात म्हशीच्या पिल्लाचा मृत्यू झाला, तर एका कुत्र्याच्या पिल्लाला अस्वलाने उचलून नेले. या घटनेनंतर परिसरातील नागरिक, विशेषतः शेतकरी आणि त्यांचे कुटुंब भयभीत झाले आहेत.
वन विभागाचे पथक घटनास्थळी त्वरित पोहोचले. वन परीक्षेत्र अधिकारी, वन रक्षक, फॉरेस्ट गार्ड आणि वन विभागाचे वाहन घटनास्थळी हजर होते. पिंजरा लावून अस्वलाला पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र अद्याप कोणतेही ठोस यश वन विभागाच्या हाती आलेले नाही.
शिवसेनेचे शैलेश उर्फ राजू मालवीय आणि सामाजिक कार्यकर्त्या मालतीताई कास्देकर या घटनेत पुढे सरसावल्या आहेत. त्यांनी शेतकऱ्याच्या नुकसानग्रस्त म्हशीच्या पिल्लासाठी योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी वन विभाग आणि प्रशासनाशी संपर्क साधला आहे.
वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळी बाहेर न पडण्याचा आणि आपल्या गुरांना सुरक्षित जागी ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, परिसरात शोधमोहिम अधिक तीव्र करण्यात आली आहे.”