आग्रा द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, कुटुंबाचा दुर्दैवी अंत

आग्रा: लखनौ-आग्रा द्रुतगती मार्गावर एका कुटुंबाचा अत्यंत दुर्दैवी अंत झाला आहे. यामध्ये जोडप्यासह त्यांच्या दोन मुलांचा अपघातात मृत्यू झाला आहे. मृत हे दिल्लीतील उत्तम नगर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. हे कुटुंब प्रयागराज येथील महाकुंभात गंगेत स्नान करायला गेले होते. तेथून घरी परतत असताना त्यांच्या वाहनाला महामार्गावर अपघात झाला आणि यात चौघांचाही मृत्यू झाला.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार की, ही घटना आग्रा येथील फतेहाबाद भागात सोमवारी (२७ जानेवारी) दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. यावेळी ४२ वर्षीय वकील ओमप्रकाश सिंग गाडी चालवत असताना त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्यावरील दुभाजक ओलांडून एक्स्प्रेस वेवर गेली आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला जोरदार धडकली.
मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस आयुक्त अमर दीप यांनी सांगितले की, या अपघातात ओमप्रकाश सिंग (वय ४२), त्यांची पत्नी पूर्णिमा (वय ३४), त्यांची मुलगी आहाना (वय १२) आणि चार वर्षांचा मुलगा विनायक यांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून कुटुंबीयांना कळवण्यात आले आहे.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक तपासात असे दिसते की चालकाला गाडी चालवताना डुलकी आली असावी त्यामुळे त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात घडला. प्रथमदर्शनी अपघाताचे कारण अतिवेग आणि चालकाला आलेली डुलकी असल्याचे सांगितले जात असले तरी अपघाताचा प्रत्येक बाजुने तपास केला जाईल, असंही पोलिसांनी सांगितलं.
याप्रकरणी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही कार प्रथम डिव्हायडरला धडकली, त्यानंतर ती कार उडून एक्स्प्रेस वेच्या दुसऱ्या लाईनवर पोहोचली, यादरम्यान कारला समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की यामध्ये कारचा चक्काचूर झाला आणि संपूर्ण कुटुंबाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने त्याच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.