2025 मराठी पत्रकारिता पुरस्कार सोहळा: अमरावती जिल्ह्यात उत्कृष्ट पत्रकारांना सन्मानित

“27 जानेवारी 2025 रोजी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, सोमेश्वर पुसदकर सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाने पत्रकारांच्या योगदानाचा गौरव केला. या भव्य सोहळ्यात, पत्रकारिता क्षेत्रातील विविध व्यक्तींना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. यावेळी, भाऊ तोरसेकर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच, दैनिक लोकमत नागपूरचे संपादक श्रीमंत माने यांना राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संगीता तिवारी यांना राहुल गटपाले पुरस्कृत विभाग स्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्राप्त झाला.
तसेच, सुरेंद्र चापोरकर यांना दैनिक विदर्भ मतदार पुरस्कृत जिल्हास्तरीय शहरी पत्रकारिता पुरस्कार मिळाला, तर मंगेश भुजबळ यांना दैनिक जनमाध्यम पुरस्कृत जिल्हास्तरीय ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षपद अमरावती मंडळ वृत्तपत्राचे संपादक अनिल अग्रवाल यांनी भूषवले. यावेळी, राज्यसभा खासदार अनिल बोंडे, खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री बच्चू कडू आणि शिवाजी शिक्षण संस्थेचे सदस्य हेमंत काळमेघ यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. सर्व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार, मूर्ती, शाल, पुष्पगुच्छ आणि रोख रक्कम देऊन सर्व विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि पत्रकारिता क्षेत्रातील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.”