नागपूर रेल्वे स्टेशनवर आंतरराज्यीय टोळी गजाआड, लाखोंचा मुद्देमाल जप्त

“नागपूर रेल्वे स्टेशनवर गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे मोबाईल आणि मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अखेर लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, पोलिसांनी सहा गुन्हे उघडकीस आणले आहेत.”
नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात कुंभमेळ्यासाठी आणि इतर ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असल्याने, त्यांच्या सुरक्षेसाठी लोहमार्ग पोलिसांनी विशेष गस्त ठेवली होती. दरम्यान, जनरल कोचमध्ये दोन प्रवाशांचे मोबाईल चोरीला गेल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी पथके तैनात करून पाच संशयितांना ताब्यात घेतले.
अटक आरोपींमध्ये आंतरराज्यीय टोळीचा प्रमुख शेख पिरू शेख सईद (रा. सुरत, गुजरात) आणि त्याचे चार साथीदार चिरागुद्दीन शहा (जळगाव), राहुल पाटील (सुरत), अनिल उनाते (नागपूर) आणि शेख वसीम (अमरावती, सध्या सुरत) यांचा समावेश आहे. या आरोपींकडून चोरी केलेले ५ मोबाईल, १ मनी पर्स आणि रोख रक्कम असा एकूण १.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक डॉ. प्रियंका नारनवरे, अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गौरव गावंडे आणि आरपीएफ निरीक्षक सत्येंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
“रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोहमार्ग पोलिसांकडून विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. या कारवाईमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, भविष्यात अशा टोळ्यांविरोधात कठोर पावले उचलली जातील, असा पोलिसांचा इशारा आहे.