बापरे ! रात्री- पहाटे थंडी, दुपारी उन्हाचा कडाका; राज्याच्या वातावरणात मोठे बदल

देशासह राज्यातही सातत्यानं हवामानामध्ये मोठे बदल होत असून, आता तापमानातही लक्षणी चढ- उताराची नोंद केली जात आहे. सध्या मुंबईसह राज्याच्या वातावरणात मोठा बदल झाला आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून पहाटेपर्यंत थंडी पडते, तर दिवसा नागरिकांना उन्हाचा कडाका सहन करावा लागतोय. ही परिस्थिती पुढील आठवडाभर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बदलत्या हवामानाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, यामुळं आरोग्याची काळजी घेण्याचंही आवाहन करण्यात येत आहे.
राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये किमान तापमानाचा आकडा वाढला आहे. ज्यामुळं प्रत्यक्षात थंडीचा प्रभाव कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच दिवसा सूर्य डोक्यावर आल्यानंतर होणारी होरपळ सध्या अनेकांच्याच अडचणी वाढवत असून, हवामानाची वितित्र स्थिती अडचणींमध्ये भर टाकताना दिसतेय.
हवामान विभागानं सविस्तर माहिती देत म्हटल्यानुसार सध्या पश्चिमी वाऱ्यांचा वेग वाढला असून, वायव्य भारतात याचा सर्वाधिक परिणाम दिसतोय. परिणामी उत्तर भारताच्या मैदानी क्षेत्रांमध्ये गारठा कमी असून, राज्यात मात्र दिवसभरात हिवाळा आणि उन्हाळा असे दोन्ही ऋतू विविध प्रहरांमध्ये दिसत आहेत. राज्यातील हवामानाची ही स्थिती फारशी बदलणार नसून, मुंबईसह उपनगरीय क्षेत्र, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातही ही स्थिती कायम राहणार आहे.
मुंबई शहरासह राज्यात रत्नागिरी इथं सर्वाधिक तापमानाची नोंद केली जाऊ शकते. इतकंच नव्हे, तर राज्यातील काही भागांमध्ये याच तापमानवाढीमुळं पावसासाठी पोषक वातावरणनिर्मितीचीसुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे.