LIVE STREAM

Latest NewsMaharashtra Politics

‘माझी कामाची पद्धत वेगळी’, रिवॉल्वर- रिल आणि बीड… पालकमंत्री अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना सज्जड दम

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी सकाळीच बीडमध्ये दाखल झाले. यावेळी धनंजय मुंडे यांनी त्यांचं स्वागत केलं. पालकमंत्री झाल्यावर अजितदादांचा हा पहिलाच बीड दौरा. या दौऱ्यात सकाळी दहा वाजता आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला ते उपस्थित राहणार असल्याचं खुद्द त्यांनीच उपस्थितांना सांगितलं.
‘बीडच्या परिसरातील अनेक बातम्या वाचत आहोत. जिथं तथ्य असेल तिथं संबंधितांवर कारवाई केली जाई. पण जिथं तथ्य नसेल तिथं कारवाईचा प्रश्न येत नाही’ असं ते म्हणाले. उपस्थित अनेक पदाधिकाऱ्यांना उद्देशून ‘बाबांनो माझी कामाची पद्धत थोडीशी वेगळी आहे’, असं स्पष्ट शब्दांत सांगितलं. आपल्याकडून कोणती कामं मंजूर झाली कर ती कामं दर्जेदार असली पाहिजेत. त्यात काहीही वेडेवाकडे प्रकार झाले तर मी सहन करणार नाही, हा जनतेचा पैसा आहे तिथं कोणतीही गडबड होता कामा नये असा थेट इशारा त्यांनी दिला.
‘काम करताना जातीपातीचा कधीच विचार करत नाही’
काम करत असताना मी जातीपातीचा विचार करत नाही, असं यावेळी अजित पवार यांनी सांगत कार्यकर्त्यांकडूनही अशाच कामाची अपेक्षा असल्याची बाब अधोरेखित केली. विकासकामं करत असताना खंडणी मागण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा माझ्या कानावर आल्यास मकोका लावायलाही मी मागेपुढे पाहणार नाही, कोणतीही टोकाची भूमिका घेईन असा सज्जड दम कार्यकर्त्यांना दिला.
रिवॉल्वर, रिल आणि…
‘मी बघतो, कोणी रिवॉल्वर काढतं, वर रिवॉल्वर उडवतात. कुणी त्या लावून फिरतं असं म्हणत जे कोणी रिवॉल्वर लावून फिरेल त्यांचा परवाना रद्द करण्याचे निर्देश आपण अधिकाऱ्यांना दिले आहेत असं अजित पवार म्हणाले. रिवॉल्वर स्वसंरक्षणासाठी असून, तुमचे हे Reel वगैरे बनतात ते मी खपवून घेणार नाही. मी सर्वांना सरखा नियम लावणार आहे. कोणावर निशाणा साधायचा नाही, पण बदल झालाच पाहिजे’, असा आग्रही सूर त्यांनी आळवला.
‘आपलं चारित्र्य स्वच्छ ठेवा, प्रतिमा जनमानसात चांगली ठेवा. कोणावर अन्याय होणार नाही, आणि कोण भरडला जाणार नाही याच धर्तीवर कामं होतील’, असं सांगत कोणाच्याही चुकीवर पांघरून घालणार नाही आणि ‘मी तुमच्या जवळचा असलो तरी चुकीचं वागू नका’ अशा स्पष्ट शब्दांत अजित पवार यांनी आपला प्रत्येक शब्द उपस्थितांपर्यंत पोहोचवला. आपल्या उपस्थितीवर हार, तुरे, मूर्ती देण्यापेक्षा संतांचे विचार आचरणात आला असं म्हणत मोजक्या शब्दात पहिल्याच दौऱ्यात अजित पवार यांनी बीडमधील व्यवस्थेवर कटाक्ष टाकला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!