Crime NewsInternational NewsLatest News
केरळमध्ये १५ वर्षीय मुलाची आत्महत्या: शाळेतील रॅगिंग आणि छळामुळे जीव गमावला

केरळ: केरळमधील एर्नाकुलम येथे एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने आपला जीव दिला. शाळेतील धोकादायक रॅगिंग आणि गुंडगिरीला कंटाळून त्याने हे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुलाची आई राजना पीएम यांनी सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट करत आपली व्यथा मांडली. 'मिहिरला मारहाण करण्यात आली, शिवीगाळ करण्यात आला आणि शेवटच्या दिवशी त्याचा अपमानही करण्यात आला. त्याच्यासोबत इतकी क्रूर वागणूक केली की तो पुरता खचला, ते आपण समजू शकत नाही'.
१५ जानेवारी २०२५ ला मिहीर नावाच्या विद्यार्थ्याने त्रिपुनिथुरा, एर्नाकुलम येथे असलेल्या त्याच्या अपार्टमेंट इमारतीच्या २६ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली होती. यानंतर त्याची आई राजना यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांच्या मुलासोबत नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे. तसेच, आता त्या आपल्या पतीसह त्यांच्या मुलाने स्वत:चा जीव का दिला हे जाणून घेण्यासाठी माहिती गोळा करण्यास सुरुवात केल्याचं सांगितलं.
'त्याच्या मित्रांशी, वर्गमित्रांशी झालेल्या संभाषणातून आणि सोशल मीडियावरील मेसेजद्वारे आम्हाला सत्य कळले. मिहिरचा अमानुष छळ करण्यात आला. शाळा आणि स्कूल बसमध्ये विद्यार्थ्यांच्या गटाकडून रॅगिंग, गुंडगिरी आणि शारीरिक हल्ला त्याच्यावर झाला. आम्ही जे पुरावे गोळा केले आहेत त्याने एक भयंकर सत्य आमच्यासमोर आलं. मिहिरला मारहाण करण्यात आली, शिवीगाळ करण्यात आली. अखेरच्या दिवशी त्याचा खूप अपमान करण्यात आला. त्याला बळजबरी शौचालयात नेण्यात आले, त्याला टॉयलेट सीट चाटायला लावली, फ्लश करताना त्याचं डोकं टॉयलेटमध्ये टाकलं. या क्रूर वागणुकीने तो अशाप्रकारे दु:खी झाला जे आपण कधीही समजू शकणार नाही.
'माझ्या मुलाच्या त्वचेच्या रंगामुळे त्याचा छळ झाला. त्याच्या मृत्यूनंतरही क्रूरता संपली नाही. ते मुलं किती क्रूर आहेत हे त्यांच्या चॅटचे स्क्रिनशॉट्स सांगतात. त्यांनी मेसेज पाठवला होता 'FK nigga... तो खरंच मेला आणि त्यांनी त्याचा मृत्यूचंही सेलिब्रेशन केलं'.
कुटुंबीयांनी पुराव्यासह सविस्तर याचिका मुख्यमंत्री कार्यालय आणि डीजीपी यांना सादर केली असून, तातडीने आणि निष्पक्ष तपासाची विनंती केली आहे. त्रिपुनिथुरा येथील हिल पॅलेस पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. परंतु कुटुंबाला भीती वाटते की डिजिटल पुरावे गोळा करण्यात उशीर झाल्याने गुन्हेगार यातून वाचू शकतात, असे ते म्हणाले.
राजना म्हणाल्या की, 'त्यांच्या मुलाचा मृत्यू व्यर्थ होता कामा नये.या अमानवीय कृत्याला जबाबदार असलेल्यांना कायद्याला सामोरे जावे लागेल आणि असे काही बदल घडवून आणावे लागतील की ज्याने कुठल्याही मुलाला मिहिर सारखे दु:ख सहन करावे लागू नये.