AmravatiLatest News
मनपा शहरी आरोग्य केंद्र आयसोलेशन अंतर्गत शाळांमध्ये कुष्ठरोग निवारण मोहीम
कुष्ठरुग्णांविषयी समाजात असलेला गैरसमज आणि त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहीजे, त्यासोबतच नव्या पिढीमध्ये कुष्ठरोगाविषयी जनजागृती वाढावी, यासाठी महानगरपालिका शहरी आरोग्य केंद्र आयसोलेशन अंतर्गत शाळांमध्ये कुष्ठरोग निवारण मोहीम राबविण्यात आली. ३१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या महिन्यादरम्यान ‘स्पर्श’ मोहीम राबवली जात आहे. ३१ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत ही मोहीम शहरातील विविध परिसरामध्ये राबवली जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ही विशेष मोहीम महानगरपालिकेच्या शाळांसह आणि खासगी शाळांमध्येही राबवली जात आहे. शाळेतील १० ते १५ या वयोगटातील मुलांना कुष्ठरोग म्हणजे काय? तो कसा पसरतो? आणि कुष्ठरुग्णांप्रती आपली काय भूमिका असली पाहिजे याची माहिती आणि मार्गदर्शन केले. त्यासोबतच, शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांनी सदर मोहीमेचे प्रतिज्ञा घेऊन जनजागृती करण्यात आली.
यावेळी कुष्ठरोगाचे संशयित लक्षण असलेल्या व्यक्तीला जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाण्यासाठी प्रेरित करेन, जर त्याला कुष्ठरोगाचे निदान झाले तर त्याला पूर्ण उपचार मिळावे यासाठी मदत करण्याची दक्षता घेईन, शिवाय, जे कुष्ठरुग्ण आढळतील त्यांच्याशी सामाजिक भेदभाव होणार नाही यासाठी प्रयत्नशील राहील, अशी प्रतिज्ञा शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतली.