मुख्याध्यापकाकडून केजीमध्ये शिकणाऱ्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, यवतमाळ जिल्ह्यातील संतापजनक प्रकार

यवतमाळच्या दिग्रस येथील शाळेत मुख्याध्यापकाने चिमुकल्या विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकावर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान, शाळेच्या मुख्याध्यापकाने विकृत कृत्य केल्याने संपूर्ण जिल्ह्यातून संताप व्यक्त करण्यात येतोय. विशाल विजयकुमार कुळकर्णी (वय 43, रा. कृष्णभूमी, दिग्रस) असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचं नाव आहे.
ऑफिसमध्ये बोलवून मुख्याध्यापकाचे अश्लील चाळे
अधिकची माहिती अशी की, केजीमध्ये शिकत असलेल्या चिमुकलीवर मुख्याध्यापकानेच अत्याचार केल्याचा प्रकार घडलाय. यवतमाळमधील एका शाळेत विद्यार्थीनी केजी 2 ला शिकते. मुख्याध्यापक विद्यार्थिनीचा काही दिवसांपासून दररोजच लैंगिक छळ करत होता. जेवणाची सुट्टी झाल्यानंतर ऑफिसमध्ये बोलवून अश्लील चाळे करत होता. मुख्याध्यापकाच्या या वर्तणामुळे विद्यार्थीनी घाबरली होती. तिने झालेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर विद्यार्थिनीच्या आईने पतीला याबाबतची माहिती दिली. मुख्याध्यापकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.