वरळीत तीन वर्षांच्या चिमुकलीच अपहरण, पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली, तीन तासात मुलगी आई वडिलांकडे, आरोपी महिलेला बेड्या

मुंबई पोलिसांच्या वरळी पोलीस स्टेशननं दमदार कामगिरी केली आहे. अपहरणाच्या प्रकरणाचा अवघ्या तीन तासात छडा लावत वरळी पोलिसांनी तीन वर्षांच्या चिमुकलीची सुटका केली. सीसीटीव्हीतून मिळालेल्या एका पुराव्याच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली अन् आरोपी महिलेचा शोध घेत तिला अटक केली तर चिमुकलीला तिच्या आई वडिलांकडे सोपवलं.
नेमकं काय घडलं?
वरळी येथे चॉकलेटचे आमीष दाखवून तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी आरोपी महिलेच्या शोधासाठी पथके सज्ज केली. पोलिसांनी अवघ्या तीन तासात आरोपी महिलेला अटक केली. आरोपी महिलेने अशा प्रकारे इतर मुलांचे अपरण केले आहे का याबाबत पोलीस तपास करत आहेत. दिपाली बबलू दास असे त्या महिलेचे नाव असून ती मूळची पश्चिम बंगालमधील रहिवासी आहे.
वरळीतील प्रेमनगर परिसरात तीन वर्षाची मुलगी बुधवारी घराबाहेर खेळत होती. त्यावेळी चाॅकलेट देण्याच्या नावाखाली तीन वर्षीय मुलीचे दिपालीने अपहरण केले.
मुलीच्या घरातल्यांनी तिचा शोध घेऊनही ती न सापडल्याने अखेर कुटुंबियांनी वरळी पोलिस ठाणे गाठत पोलिसांकडे मदत मागितली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र काटकर यांनी तात्काळ मुलीच्या शोधासाठी काही पथक पाठवली. परिसरातील सीसीटिव्ही फूटेज तपासले. त्यावेळी एका किराणा दुकानाजवळील सीसीटीव्हीत आरोपी दिपाली मुलीसह दिसली. त्या चित्रणाची चित्रफीत बनवून पोलीस ठाणेचा व्हाट्सअप ग्रुप, तसेच मोहल्ला कमिटीच्या व्हाट्सअप ग्रुपवर पठवून आरोपी महिलेचा शोध सुरू केला.
पोलिस तपासात वरळी नाका प्रेमनगर येथील एका खोली क्रमांक ५२० मध्ये दिपाली पोलिसांना सापडली. त्यावेळी पोलिसांनी अपहरणकर्त्या मुलीची सुटका करून तिला कुटुंबियांच्या स्वाधीन केले याप्रकरणी दिपालीला अटक करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल रुपवते, महिला पोलीस उपनिरीक्षक उषा मस्कर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांची दमदार कामगिरी
वरळीतील घटनेत पोलिसांच्या हाती सीसीटीव्हीतून मिळालेला एक पुरावा होता. त्या पुराव्याच्या आधारे मुंबई पोलिसांच्या वरळी पोलीस स्टेशननं तपासाची चक्र फिरवली. अवघ्या तीन तासांमध्ये पोलिसांना आरोपी महिलेला अटक करण्यात यश आलं. तर, संबंधित चिमुकलीला पोलिसांनी तिच्या आई वडिलांकडे सोपवलं. अपहरण झालेल्या चिमुकलीच्या आई वडिलांनी वेळीच पोलिसांकडे धाव घेतल्यानं तातडीनं चिमुकलीचा शोध घेण्यात देखील पोलिसांना यश आलं.