AmravatiLatest NewsLocal News
विद्यापीठात स्व. श्री गोविंदाजी खोब्राागडे स्मृती व्याख्यानमाला संपन्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकारितेतून स्वाभिमान जागविला, असे प्रतिपादन नागपूर येथील सुप्रसिध्द वक्ते प्रा. रणजीत मेश्राम यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्यावतीने स्व. श्री गोविंदाजी खोब्राागडे स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता’ या विषयावर व्याख्यान देतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनसंचार संस्थेचे क्षेत्रिय संचालक डॉ. राजेशसिंह कुशवाह, दानदात्यांचे प्रतिनिधी श्रीमती रजनीताई खोब्राागडे,अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड यांची उपस्थिती होती.
प्रा. मेश्राम पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारितेतून जागरण आणि प्रबोधन केले. राष्ट्रजागृती आणि स्वातंत्र्यासाठी देशात आंदोलने झालीत, परंतु डॉ. बाबासाहेबांची पत्रकारिता याहून वेगळी होती. सार्वजनिक चळवळीची पायाभरणी डॉ. बाबासाहेबांनी पत्रकारितेतून केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथमत: मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. या पाक्षिक सुरू करण्यामागील पार्·ाभूमीही त्यांनी याप्रसंगी सांगितली. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेबांची पत्रकारितेची स्पंदने आणि त्यांची दूरदृष्टी वेगळी होती. अग्रलेख, स्तभांमधून त्यांनी आरोपांवर सडेतोड उत्तरे दिलीत आणि त्यांच्या कष्टाला पत्रकारितेनेही साथ दिली. गावोगाव जागृत झाले, माणसे उभी झालीत. विचार जीवंत ठेवण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी पत्रकारितेच्या माध्यमातून माणसे उभी केलीत.
1924 मध्ये बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन करुन त्यांनी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केले. त्यामाध्यमातून त्यांनी प्रत्येकाला जागृत केले. प्रत्येक आरोपांना त्यांनी चोख उत्तर दिले. गोलमेज परिषदेतही डॉ. बाबासाहेबांनी जनतेचा खरा आवाज उठविला. त्यावेळीही त्यांची पत्रकारिता भक्कमपणे उभी राहिली. 1937 मध्ये त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करुन निवडणुकही लढविली आणि आपले प्रतिनिधी निवडून आणले. हे सर्व डॉ. बाबासाहेबांच्या पत्रकारितेमुळे घडले, असेही प्रा. मेश्राम म्हणाले.
प्रमुख अतिथी भारतीय जनसंचार संस्थेचे क्षेत्रिय संचालक डॉ. राजेशसिंह कुशवाह म्हणाले, बंदुकीपेक्षाही भयंकर ताकत पत्रकारितेत आहे. वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रबोधन, शिक्षण आणि जागृती होते. सध्याच्या काळात आर्टीफिशियल इंटेलिजन्सचा मोठा वापर होत आहे. गुड गव्र्हनन्सकरीताही मोठा वापर होत आहे. डॉ. बाबासाहेबांच्या पत्रकारितेमधून समृध्द, सशक्त व संपन्न असा भारत निर्माण होईल.