सुखद शेवट! वाढदिवसाला हरवलेला संचित सुखरूप सापडला
नागपूरच्या वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सकाळी हरवलेला 10 वर्षीय मुलगा संचित नरड अखेर सुखरूप सापडला. पोलीसांनी वेळेवर आणि तात्काळ केलेल्या शोधमोहीमेने एका कुटुंबाला पुन्हा आनंद मिळवून दिला. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीराम नगर येथील 10 वर्षीय मुलगा संचित अरविंद नरड सकाळी 11 वाजल्यापासून घरातून बेपत्ता झाला. आई-वडिलांनी खूप शोध घेतला, मात्र दुपारी 4 वाजता त्यांनी वाठोडा पोलिसांकडे मदत मागितली. तात्काळ पोलीस निरीक्षकांनी वेगवेगळ्या टीम तयार करून संचितचा शोध सुरू केला. अखेर पोलीस बिट मार्शल पथकातील पो. हवा. शशिकांत बक्कल व पो. कॉन्स्टेबल शैलेंद्रसिंग यांनी संचितला संध्याकाळी 4.55 वाजता स्वामीनारायण मंदिराजवळ सुखरूप सापडले.
प्राथमिक चौकशीत संचितने सांगितले की, आज त्याचा वाढदिवस असूनही घरी कोणीही तो साजरा केला नाही. त्यामुळे तो रागाच्या भरात घर सोडून निघून गेला. मात्र वाठोडा पोलिसांनी त्याला आई-वडिलांकडे सुखरूप सुपूर्द करत, केक कापून त्याचा वाढदिवसही साजरा केला. आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते आनंदाश्रू होते. पोलिसांच्या तत्परतेमुळे त्यांचा मुलगा परत मिळाला, हे त्यांच्यासाठी मोठे सुखदायक क्षण ठरले. “वाठोडा पोलिसांच्या तातडीच्या आणि संवेदनशीलतेने भरलेल्या प्रयत्नांमुळे एका कुटुंबाचा आनंद परत मिळाला. हा केवळ शोधाचा विजय नाही, तर मानवतेचा देखील मोठा संदेश आहे. अशाच तत्पर सेवेसाठी पोलिसांचे आभार! अशीच मदतीची भावना जपावी, हाच संदेश या घटनेतून मिळतो!