गिट्टीखदान पोलिसांनी हद्दपार आरोपीकडून रिव्हॉल्वर आणि जिवंत कारतुस जप्त केले

नागपूर :- गिट्टीखदान पोलीस स्टेशनने एक मोठी कारवाई केली आहे. हद्दपार आरोपीला अग्नीशस्त्रांसह पकडण्यात आले आहे. तपास पथकाने केलीली ही कारवाई नागपूर शहरात चर्चेचा विषय बनली आहे. यासंबंधी तपशील घेऊया.
गिट्टीखदान पोलिसांनी ३० जानेवारी रोजी रात्री ११.०० वाजता पेट्रोलिंग करत असताना एक हद्दपार आरोपी पकडला. या आरोपीकडून एक लोखंडी रिव्हॉल्वर आणि जिवंत कारतुस जप्त करण्यात आले. गिट्टीखदान पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली होती की, एक हद्दपार व्यक्ती सिपीडब्ल्यूडी बंद क्वॉर्टर परिसरात लपून वास्तव्य करीत आहे.
त्यावरून पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारला, तेव्हा आरोपीने पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्यास पकडले. पकडलेल्या आरोपीचे नाव मनिष उर्फ लक्की गुरू पिल्ले, वय २५ वर्ष, रा. पंचशील नगर, नागपूर असे समोर आले.
आरोपीची अंगझडती घेतल्यावर त्याच्या जवळ लोखंडी देशी बनावटीची रिव्हॉल्वर आणि एक जिवंत कारतुस सापडले. या मुद्देमालाची किंमत अंदाजे २५,५०० रुपये आहे. आरोपीचा अभिलेख तपासल्यानंतर समोर आले की, त्यास १९ सप्टेंबर २०२४ पासून नागपूर शहर आणि ग्रामीण हद्दीपासून हद्दपार करण्यात आले आहे.
आरोपीने विनापरवाना अग्नीशस्त्र बाळगल्याने, गिट्टीखदान पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात कलम ३/२५ भा. ह. का., सहकलम १३५, १४२ म. पो. का. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक करून पुढील तपास सुरू आहे.