Amaravti GraminLatest News
‘बिजली दो-बिजली दो’ गगनभेदी नाऱ्यासह हजारो शेतकऱ्यांचा धडक मोर्चा

धारणी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या ढाकणा फिडर मधील जवळपास 25 गावात गेल्या बऱ्याच काळापासून पाहिजे त्या प्रमाणात विद्युत दाब आणि अखंडित विद्युत पुरवठा होत नसल्यामुळे होणारे शेतीचे नुकसान आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्येला अनुसरून संबंधित गावातील नागरिक आणि शेतकऱ्यांचा आक्रोश धडक मोर्चा हजारोच्या संख्येत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. धारणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणापासून सुरू झालेला जन आक्रोश मोर्चा 'बिजली दो-बिजली दो' गगनभेदी नाऱ्यासह बुधवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला; ज्यानंतर स्थानिक प्रशासनासह विद्युत वितरण कंपनी प्रशासनामध्ये एकच खळबळ माजली होती.
भारत देशाने आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केल्यानंतरही आदिवासीबहुल मेळघाट क्षेत्राच्या बहुतांश गावांमध्ये आजही विद्युत जोडणी झालेली नाही. इतकेच नव्हे तर ज्या ठिकाणी विद्युत जोडणी करण्यात आली आहे त्या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात विद्युत दाब आणि अखंडित विद्युत पुरवठा होत नसल्याचे दिसुन येत आहे. ज्याचे जिवंत उदाहरण गेल्या अनेक काळापासून ढाकणा फीडर मधील तब्बल 25 गावातील नागरिक अनुभवत आहेत. ढाकणा फीडर मध्ये गेल्या बऱ्याच काळापासून शेतकरी आणि स्थानिक ग्रामस्थ लो व्होल्टेजच्या समस्येनी ग्रस्त आहे, विद्युत पुरवठा पाहिजे त्या प्रमाणात मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचन सुविधा करणे अशक्य झाले आहे इतकेच नव्हे तर विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे गावातील पाणीपुरवठा योजना ठप्प पडली आहे परिणामी नागरिकांना नदी नाल्याचे गढूळ पाण्याचे सेवन करावे लागत आहे. या सर्व समस्यांना अनुसरून ढाकणा फिडर अंतर्गत येणारे हजारो नागरिक आणि शेतकरी आपल्या मागणीला अनुसरून धडक मोर्च्यामध्ये सहभागी झाले होते. हजारोच्या संख्येत शेतकरी बांधव आपल्या समस्येला अनुसरून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि विद्युत वितरण कंपनीची काही वेळा करिता तारांबळ उडाली होती हे विशेष. मोर्चामध्ये ढाकना फीडर अंतर्गत येणाऱ्या राणामालुर ग्रामपंचायतचे सरपंच गंगाताई जावरकर, महाराष्ट्र जनक्रांती सेनेचे संस्थापक मन्ना दारसिंबे, बिजुधावडी सरपंच, तातरा, गडगाभांडुम, झापल, ढाकणा या ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व नागरिक सोबतच शेतकरी बांधव मोठ्या संख्येनी उपस्थित झाले होते. याप्रसंगी आंदोलन स्थळी स्थानिक प्रशासनाकडून तहसीलदार प्रदीप शेवाळे, पोलीस निरीक्षक अशोक जाधव तर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून मुख्य अभियंता विद्युत वितरण कंपनी अमरावती ज्ञानेश कुलकर्णी, उपअभियंता ए एन गंटीवार, शाखा अभियंता व इतर कर्मचारी उपस्थित झाले होते. विद्युत वितरण कंपनीकडून आंदोलन कर्त्यांना पाच दिवसांचे लेखी आश्वासन देण्यात आले असून तात्पुरता स्वरूपामध्ये व्होलटेजची समस्या आणि वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्याच्या समस्ये पासून नागरिकांना सुटका दिली जाणार ज्याकरीता कैपेसीटर बँड्स मांडवा, टेंबली, बिजुधावडी, गडगामालुर आणि बोरीखेडा येथे येत्या पाच दिवसात लावले जाणार असे आश्वासन विद्युत वितरण कंपनीकडून देण्यात आले आहे. तर दुसरीकडे चार दिवसांमध्ये समस्यांचे निराकरण न झाल्यास पुन्हा एकदा तीव्र ठिया आंदोलन शासन प्रशासनाच्या विरुद्ध पुकारले जाणार असल्याचा इशारा उपस्थित आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.