अंबरनाथमध्ये दिवसाच्या वेळी एका महिलेची हत्या झाली. ती रेल्वेकडे जाणाऱ्या ब्रिजवर घडली.

अंबरनाथ :- अंबरनाथमध्ये भर दिवसा एका महिलेची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. शहरातील हुतात्मा चौकाकडून स्टेशनकडे जाणाऱ्या साईबाबा मंदिराच्या रस्त्यावर ही घटना घडली आहे. या घटनेत बोलत बसले असताना दोघांमध्ये वाद होऊन सदर इसमाने महिलेवर चाकूने वार केला. यात तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
अंबरनाथ शहरात भर दुपारची मंदिर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सदरची घटना घडण्यापूर्वी एक महिला आणि पुरुष असे दोघे जण साईबाबा मंदिराच्या शेजारील पायऱ्यांवर बोलत बसले होते. दोघांमध्ये गप्पा सुरु असताना कोणत्यातरी क्षुल्लक कारणावरून अचानक त्यांच्यात वाद झाला. हा वाद होत त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. यातच पुरुषाने महिलेच्या पोटात चाकू भोसकून तिथून पळ काढल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.
नागरिकांनी नेले रुग्णालयात
महिलेवर चाकूने वार करत असताना महिलेचा आवाज ऐकून काहींनी घटना पाहिली. यावेळी वाचविण्यास गेले तर आपल्यावर देखील चाकूने हल्ला करेल या भीतीतून वाचविण्यासाठी जाण्याची कोणी हिम्मत केली नाही. हल्ला करून सदर इसम फरार झाला. सदर घटना घडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात जमलेल्या लोकांनी जखमी महिलेला तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात नेलं. मात्र तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात
सदर घटना घडल्यानंतर नागरिकांनी याबाबत पोलिसात माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवत हल्लेखोर इसमाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. दरम्यान भरदिवसा घडलेल्या या हत्येच्या घटनेमुळे अंबरनाथ शहरात खळबळ उडाली आहे.